स्मार्ट सिटी टॅँकरच्या पाण्यावर! बाणेर, पाषाण, बालेवाडीला अपुरा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:01 AM2018-06-05T06:01:17+5:302018-06-05T06:01:17+5:30
पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने या भागाला टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
पाषाण : पुण्याचा स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने या भागाला टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न मुळापासून सोडविला गेला नसल्याने सगळ्याच भागात पाणीपुरवठ्यात अडथळे येत आहे.
‘लोकमत’ने या भागातील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता अनेक सोसायट्यांना टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसून आले आहे. बाणेर-बालेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु, पाण्याचा प्रश्न सुटला नाही. अनेक सोसायट्यांना दररोज टॅँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
बाणेर-बालेवाडी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाने नवीन बांधकामास बंदी केली होती. यानंतर ही बंदी पालिकेच्या लेखी निवेदनानंतर उठवण्यात आली होती; परंतु योग्य पाठपुरावा देण्यास प्रशासन
अद्याप यशस्वी झाले नसल्याचे
चित्र बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात येणाºया टॅँकरमुळे पाहायला मिळत आहे.
बाणेर-बालेवाडी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाषाण परिसरातील पाणीपुरवठा कमी करून हा पाणीप्रश्न सोडविण्याचा दावा प्रशासन करत आहे. यामुळे बाणेर, बालेवाडी येथील पाणीप्रश्न सोडविल्याचा दावा खरा किती, खोटा किती समिती पुढे येणाºया तक्रारींनुसार समजणार आहे.
सध्या बाणेर- पाषाण लिंक रस्ता परिसरातील कुमार शांतीनिकेतन, निकष लॉन्स, आॅरेंज काऊंटी, फेलिसिटा, कोलिना व्हिस्टा या सोसाट्यांना दररोज पाण्याचा टॅँकर विकत घ्यावा लागत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये अर्धा ते एक तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
टॅँकरच्या संख्येत घट झाल्याचा महापालिकेचा दावा
या परिसरात महापालिकेने तिथे २४ तास पाणी योजनेतील ५ पाणी साठवण टाक्यांचे काम सुरू केले. त्यानंतर पाषाण येथील पंपिंग स्टेशनवर जादा शक्तीचा पंप बसविले. आवश्यक त्या सर्व ठिकाणी नळजोड पुरवले. पाणीपुरवठ्याच्या वेळामध्ये सुधारणा केली. त्याचा परिणाम म्हणून या भागातील टँकरच्या संख्येत एकदम घट झाली. परिसरातील सोसायट्यांनी स्थानिक नगरसेवकांकडे तशी पत्रही दिली आहेत, असा दावा महापालिकेने केला आहे.
विभागीय आयुक्त ऐकणार पाण्याच्या तक्रारी
न्यायालयाच्या आदेशाने बाणेर-बालेवाडी परिसरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्या संदर्भातील समस्या ऐकण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मंगळवारी (५ जून) पाच वाजता या समितीची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. त्या वेळी या भागातील नागरिकांनी आपले पाणीपुरवठ्याबातचे म्हणणे, तक्रारी समितीपुढे लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
बांधकामांना परवानगी देऊन त्यासाठी विकासनिधी घेतला जातो, नागरिक राहायला आले की त्यांच्याकडून मिळकत कर घेतला जातो. तरीही पाणी पुरवण्यात महापालिकेला अपयश येते आहे, असा मुद्दा उपस्थित करून नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीत महापालिकेने नव्याने होणाºया बांधकामांची संख्या जास्त असल्यामुळे असे होत असल्याचे उत्तर दिले होते. त्यावर न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढत या सर्व परिसरात नव्याने बांधकाम करायला मनाई करणारा आदेश जारी केला होता.
अस्टर हेरिटेज सोसायटीमध्ये ५ ते ६ वर्षांपासून पाणी विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. सोसायटीतील सर्व नागरिक पाण्याच्या गंभीर समस्येने व खर्चामुळे त्रस्त आहेत. प्रशासन पाणी, रस्ते, स्ट्रिट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. पाण्याची समस्या घेऊन आम्ही अनेक वर्षांपासून नगरसेवकांपासून महापालिकेपर्यंत जात आहोत; परंतु अद्याप
या समस्येवरती
कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.
- केतुल शहा,
फ्लॅटधारक
बाणेर, पाषाण लिंक रस्ता परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे दररोज टॅँकर घ्यावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून आम्ही नियमित पाण्याची मागणी करीत आहोत.
- रवी सिन्हा,
बाणेर-पाषाण लिंक रस्ता विकास समिती
आम्हाला दररोज पाच ते सहा टँकर पाणी विकत घ्यावे लागते. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टॅँकरने पाणी घेण्याशिवाय आमच्यासमोर कोणताच पर्याय राहिलेला नाही.
- सीमा अगरवाल,
कुमार शांतीनिकेतन सोसायटी
आमच्या परिसरात महापालिकेकडून पाणी पुरवठा अपुरा होत आहे. पाणी योग्य दाबाने येत नसल्यामुळे टंचाई निर्माण होत आहे. आम्हाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
- मोरेश्वर बालवडकर, ४३ सोसायटी, बालेवाडी