बिबट्या पकडणार तोच तिने केली ''ही'' कृती आणि वाचवला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 06:47 PM2018-07-01T18:47:19+5:302018-07-01T18:52:43+5:30
अक्षदा ओट्यावर असताना मांजरीवर बिबट्याने झडप घातली आणि मांजर पळून गेली. पुढची झडप अक्षदावर असणार हे स्पष्टच होते.
राजुरी (ता. जुन्नर): वेळ संध्याकाळची, जुन्नरजवळच्या राजुरी गावात राहणारी अक्षदा हाडवळे ही तरुणी संध्याकाळी सात वाजता घरावजवळच्या ओट्यावर भुईमुगाच्या शेंगा धुवत बसली होती. अचानक बाजूच्या मक्याच्या शेतातून बिबट्याने तिच्या शेजारी बसलेल्या मांजरीवर झडप टाकली. पुढची झडप अक्षदावर असणार हे स्पष्टच होते. पण क्षणाचा विलंबही न लावता जिवाच्या आकांताने ती ओरडली आणि पळत घरात जात तिने दार बंद केलं. अंगावर काटा उभा राहावा अशी ही घटना काल घडली असून जुन्नर परिसरात तिच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, राजुरी येथील अंबिकानगर भागात अशोक हाडवळे आणि कुटुंबीय राहतात.त्यांच्या घराच्या आजूबाजूला मक्याचे शेत आहे. शेत परिसरात बिबट्याचा वावरही आहे. पण शनिवारी घडलेल्या घटनेने सर्वांचाच थरकाप उडाला आहे. अक्षदा ओट्यावर असताना मांजरीवर बिबट्याने झडप घातली आणि मांजर पळून गेली. चिडलेला बिबट्या अक्षदावर झेपावणार तेवढयात तिने ओरडतच घराचा दरवाजा लावला. इतका आरडाओरडा का झाला म्हणून तिचे आईवडील धावत आले तेव्हा तिने ही सर्व हकीकत सांगितली. आपल्या मुलीने शिताफीने दरवाजा बंद करून तिचाच नाही तर कुटुंबाचाही जीव वाचवल्याचे त्यांच्या लक्षात आले. आज तिचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी नोंदवली आहे.
दरम्यान राजुरी गाव बिबट्याप्रवण क्षेत्र असून पंधरा दिवसांपुर्वीच याच मळयातील मंगेश हाडवळे हया शेतक-याच्या चार शेळयांवर बिबटयाने हल्ला करून ठार केले. याच ठिकाणी दोन दिवसांपुर्वी बबन कदम घराजवळून बिबट्याच्या वावर बघायला मिळाला होता. वनविभागाचे अधिकारी जे.बी.सानप यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.या ठिकाणी बिबट्याचे ताजे ठसे आढळले असून रविवारी संध्याकाळपर्यंत पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.