प्रभाग ६७मध्ये ‘मी स्मार्ट’ सेवा

By admin | Published: July 14, 2016 12:57 AM2016-07-14T00:57:28+5:302016-07-14T00:57:28+5:30

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची शहरात सुरुवात होण्यापूर्वीच माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रभाग क्रमांक ६७ मध्ये स्मार्ट सेवा सुविधांचा पहिला टप्पा कार्यान्वित केला आहे

'Smart Me' service in Ward 67 | प्रभाग ६७मध्ये ‘मी स्मार्ट’ सेवा

प्रभाग ६७मध्ये ‘मी स्मार्ट’ सेवा

Next

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची शहरात सुरुवात होण्यापूर्वीच माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रभाग क्रमांक ६७ मध्ये स्मार्ट सेवा सुविधांचा पहिला टप्पा कार्यान्वित केला आहे. यामध्ये अत्याधुनिक बसस्टॉप, सिटीजन पोर्टल, मोबाइल अ‍ॅप, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, स्मार्ट डस्टबिन आदी सुविधा पुरविल्या जात आहेत.
प्रभाग क्रमांक ६७ मध्ये पुरविण्यात आलेल्या स्मार्ट सेवांच्या पहिल्या टप्प्याचे येत्या शनिवारी (ता. १६) लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून काही निवडक शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविली जात आहे. त्यामध्ये पुणे शहराचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्ट सिटीअंतर्गत ज्या सेवा-सुविधा दिल्या जाणार आहेत, त्या प्रभाग ६७ मध्ये त्यापूर्वीच उभारण्यात आल्या असून, हा प्रभाग राज्यातील पहिला स्मार्ट प्रभाग बनल्याचा दावा आबा बागुल यांनी केला आहे.
बागुल यांनी सांगितले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेसाठी एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना केवळ ९० लाख रुपयांत प्रभाग स्मार्ट करण्यात आम्हाला यश आले आहे. हा पहिला टप्पा असून, लवकरच दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात येणार आहे. गेली अनेक दिवस पुणेकरांना स्मार्ट सिटीच्या गोंडस स्वप्नात रंगवले जात आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प कधी होणार, हा प्रश्न सामान्य पुणेकरांच्या मनात डोकावतो आहे.
नागरिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये यासाठी स्मार्ट डस्टबिन प्रभागात बसविण्यात आले आहेत. या कचरापेटीला सेन्सर बसविण्यात आला असून, ती भरली की लगेच त्याची माहिती संबंधितांना मिळेल, त्यानंतर ई-रिक्षाद्वारे हा कचरा उचलला जाणार आहे. प्रभागात ४ ठिकाणी हे डस्टबिन उभारण्यात आले आहेत. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सिटीजन पोर्टल, मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे अलर्ट्स, तातडीच्या सेवा, तक्रार नोंदविण्याची सुविधा मिळणार आहे. या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Smart Me' service in Ward 67

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.