स्मार्ट पुण्याचा अजूनही मूलभूत समस्यांशीच झगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:23 PM2018-05-10T16:23:16+5:302018-05-10T16:24:16+5:30
एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे.
पुणे : एकीकडे स्मार्ट सिटीचा बोलबाला करणाऱ्या पुणे शहरात अजूनही नागरी समस्येचे मूळ कचरा, पाणी, रस्ते आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येत अडकले असल्याचे समोर आले आहे. पुण्यात सध्या सुरु असलेल्या महापौर आपल्या दारी या उपक्रमात ही स्थिती लक्षात आली आहे. त्यामुळे स्मार्ट पुण्यात नागरिकांचा आजही मूलभूत समस्यांशी झगडा सुरु आहे.
सुमारे ५ हजार ५९२ कोटी रुपयांचा भरभक्कम अर्थसंकल्प यंदा पुणे महापालिकेने सादर केला. त्यानुसार गेल्या सहा महिन्यात शहरात वेगवेगळ्या योजना राबवण्यास सुरुवातही झाली आहे. याशिवाय शहराच्या काही भागात स्मार्ट सिटी योजना सुरु आहे. त्यातील काही योजना संपूर्ण शहरातही राबवल्या जात आहेत.शहराची लोकसंख्या सध्या सुमारे ४० लाखांच्या आसपास आहे. महापालिकेत नुकतीच ११ गावेही समाविष्ट करण्यात आली. वाढत्या क्षेत्रफळामुळे महापालिकेचे कार्य जास्तीत जास्त विस्तारत आहे. मात्र त्याआधीच शहरात मूलभूत सुविधांची वानवा आहे का असा प्रश्न पडावा अशा समस्या महापौर तुमच्या दारी या उपक्रमातून समोर आल्या आहेत. महापौरांकडे नागरिकांना थेट प्रश्न मांडता यावेत म्हणून सर्व क्षेत्रीय कार्यालयात एक दिवस या प्रमाणे पंधरा दिवस महापौर नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेतात. शक्य त्या समस्या सोडवण्याचे आदेश देतात. प्रश्न अधिक किचकट असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना वेगाने काम करण्याची सूचना करतात. सध्या महापौर मुक्ता टिळक करत असलेल्या उपक्रमात सर्वाधिक समस्या या रस्ते, गटार, पाणी, भटकी कुत्री अशाच दिसून येत आहेत. एका प्रभागात चार नगरसेवक, क्षेत्रीय कार्यालय अशी सर्व सुविधा असतानाही नागरिक अजूनही मूलभूत समस्यांसोबत झुंजत असल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. या समस्या अनेक वर्षांपासून असून कोणत्याही पक्षाचा महापौर झाला तर त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात याच समस्या मांडल्या जात आहेत. त्यामुळे राजकीय मुद्द्यावर गोंधळ घालणारे पक्ष विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांना समाधानी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसते का या विषयावर आम्ही काही स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला.
सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी बोलताना हे फक्त सोहळे चालू असल्याची प्रतिक्रिया दिली. महापौरांना लोकांपर्यंत जाऊन मूलभूत समस्या सोडवाव्या लागत असतील तर ते स्थानिक नगरसेवकांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात दिले जाणारे आदेशांचे पुढे काय झाले हेदेखील बघितले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीपल्स युनियनचे रमेश धर्मवत यांनी या उपक्रमात फक्त मूलभूत समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित नसल्याचे सांगितले. रस्ते, पाणी, गटार असे प्रश्न सोडवायला नगरसेवक आहेतच. महापौरांनी लोकांसमोर करवाढ किंवा पार्किंग पॉलिसी अशा विषयांवर भूमिका मांडणे गरजेचे आहे. असे केले तर हा कार्यक्रम चमकोगिरी ठरणार नाही.