स्मार्ट पुण्याची अंधारमय पिढी; झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अल्पवयीन वळतायेत गुन्हेगारीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:14 PM2022-11-10T15:14:17+5:302022-11-10T15:14:24+5:30

झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषाने अल्पवयीन गुन्हेगारीकडे वळत आहेत

Smart Pune Dark Generation Juveniles turn to crime to make quick money | स्मार्ट पुण्याची अंधारमय पिढी; झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अल्पवयीन वळतायेत गुन्हेगारीकडे

स्मार्ट पुण्याची अंधारमय पिढी; झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अल्पवयीन वळतायेत गुन्हेगारीकडे

googlenewsNext

नम्रता फडणीस

पुणे: रस्त्यावर बिनधास्तपणे ट्रिपल सीट जाणारी... गाडीला चुकून धक्का लागला तर अंगावर धावून जात हाणामाऱ्यांवर उतरणारी... हातात तलवारी घेऊन दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडांबरोबर लीलया वावरणारी... पादचाऱ्यांच्या हातून मोबाइल हिसकावून पळून जाणारी ही अल्पवयीन मुलेच हळूहळू गुन्हेगारी विश्वाचा चेहरा बनू लागली आहेत. झटपट पैसा मिळविण्याच्या आमिषाने ते गुन्हेगारीकडे वळत आहेत.

गुन्हेगारी मार्गाकडे वळणाऱ्या अल्पवयीनांमध्ये झोपडपट्टी भागातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गेल्या दहा महिन्यांत जवळपास ३५३ गुन्हे अल्पवयीनांवर दाखल झाल्याचे दिसून येत आहे. अवघ्या दिवसांवरच बालदिन येऊन ठेपला आहे. हा बालदिन साजरा करीत असतानाच अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीमधील हे वाढते प्रमाण पालक, समाज आणि पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

ही आहेत कारणे

- अल्पवयीन मुलांना फारशी गंभीर शिक्षा होत नसल्याने टोळ्यांकडून अल्पवयीन मुलांना लक्ष्य करणे सहज सोपे झाले आहे. हाणामाऱ्या असाे किंवा वाहन चोरी. या गुन्ह्यांमध्ये मुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर हाेत आहे.
- आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेऊ न शकणारी अनेक मुले शिक्षणापासून कायमची दुरावली आहेत. यातच आई-वडील विभक्त राहत असल्याचा फटकाही मुलांना बसत आहे.
- पालक कामानिमित्त घराबाहेर जात असल्याने घरात मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी स्थिती आहे. मुलगा नक्की कुणाच्या संगतीत आहे?, तो कुणाबरोबर जातो, याचा बहुतांश पालकांना पत्ताच नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पाेलीस म्हणतात...

- मुलगा एखादा गुन्ह्यात सापडतो तेव्हाच पालकांना कळते. त्यामुळे मुलांना गुन्ह्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस दलानेच कंबर कसली आहे.
- ‘होप फॉर चिल्ड्रन’सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात कृती कार्यक्रम राबविला जात आहे.
- शहरातील ३२ पोलीस ठाण्यात बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यात पालकांशी संवाद साधून गुन्हेगारीमागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
- जी मुले शिक्षणापासून दुरावली आहेत. त्यांना शिक्षण पूर्ण करायचे असल्यास स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संधी दिली जात आहे. चोऱ्या-माऱ्या सोडायला लावण्याच्या दृष्टीने मुलांना व्होकेशनल कोर्सेस दिले जात आहेत.

''परिमंडळ १ च्या सर्व पोलीस ठाण्यात दि. २ नोव्हेंबरपासून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित चारही परिमंडळात हा कृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. - अर्चना कटके, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल''

''महाराष्ट्रात जास्त पैसे मिळत असल्याने इतर राज्यांतील मुले पळून महाराष्ट्रात येत आहेत. स्थानिक अल्पवयीन मुलेदेखील झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाने गुन्हेगारीकडे वळत आहेत. अल्पवयीन मुलांना तीन महिन्यांच्या आत सोडून देतात, हे टोळीप्रमुख आणि सराईत गुन्हेगारांना माहीत असल्याने त्यांनाच गुन्ह्यात वापरून घेतले जात आहे. तलवारीने केक कापल्याचा फोटो स्टेटसवर ठेवणे, फाेटाे व्हायरल करून गुन्हेगारीकडे ही पिढी आकर्षित केली जात आहे. - ॲड. यशपाल पुरोहित, सदस्य, बाल न्याय मंडळ''

कायदा काय सांगतो?

- बाल न्याय अधिनियम (काळजी व संरक्षण) २०१५ नुसार सात ते अठरा वर्षांखालील ज्याने गुन्हा केल्याची शक्यता आहे, अशा बालकांविषयी निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार बाल न्याय मंडळास आहेत.
- पोलिसांनी बालकाला ताब्यात घेतल्यास २४ तासांच्या आत बाल न्याय मंडळासमोर हजर करणे आवश्यक आहे.
- बालक पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला हातकडी लावणे, मारहाण करणे, पोलीस कोठडी अथवा कारागृहात ठेवण्यास मनाई आहे. तसेच पालकांसह परिवीक्षा अधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे.
- बालकांची जमानत नाकारल्यास निरीक्षणगृहात त्याची तात्पुरती व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- बेकायदेशीर कृत्यासाठी बालकांचा वापर करणारी व्यक्ती कठोर कारावास व शिक्षेस पात्र समजली जाईल.

Web Title: Smart Pune Dark Generation Juveniles turn to crime to make quick money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.