स्मार्ट पुणे होईना स्वच्छ
By admin | Published: May 5, 2017 03:14 AM2017-05-05T03:14:31+5:302017-05-05T03:14:31+5:30
कचऱ्याचा प्रश्न पेटल्याने संपूर्ण शहराला कचराकुंडीचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली असताना स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर
पुणे : कचऱ्याचा प्रश्न पेटल्याने संपूर्ण शहराला कचराकुंडीचे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली असताना स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर पुण्याची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून स्मार्ट सिटी योजना सुरू होऊनही महापालिका प्रशासनाला केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मात्र उल्लेखनीय कामगिरी करून दाखवता आलेली नाही. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मागील वर्षी असलेला ११ वा क्रमांक याहीवर्षी पुणे शहराने कायम राखला. पुढचा क्रमांक मिळवण्याची मनीषा प्रशासनाला प्रत्यक्षात आणता आलेली नाही.
केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील शहरांचे स्वच्छ शहरे या निकषातंर्गत सर्वेक्षण करण्यात येते. क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया या संस्थेच्या वतीने देशभरातील मेट्रो शहरांचे यात सर्वेक्षण केले जाते. घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेली उपाययोजना, त्यातील उल्लेखनीय प्रयोग, त्यांची यशस्विता, शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, असे काही निकष लावून हे सर्वेक्षण करण्यात येते.
कचरा डंप करण्याची मर्यादा संपणार
सलग १८ दिवस कचरा हा कचरा डेपोमध्ये नेता आला नसला तरी वेगवेगळ्या प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कचरा डंप करण्यात येत आहे. दिशा तसेच अजिंक्य प्रकल्पांच्या जागेत हा कचरा नेण्यात येत आहे. मात्र आता या प्रकल्पांची कचरा सामावून घेण्याची क्षमता पूर्ण होत आली आहे. कचरा डेपोची समस्या आणखी काही दिवस अशीच लांबणीवर पडत राहिली तर शहरात लवकरच कचरा साचून राहील. अवकाळी पाऊस झाला तर ही समस्या शहराला साथीच्या आजारांकडे घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे.
क्रमांक अकरावा की तेरावा ?
मागील वर्षी पुणे शहर या यादीत ११ व्या क्रमाकांवर होते. यावेळी एकूण ५०० शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यात देशातील लहान शहरांचाही (३ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या) समावेश होता. त्यातही पुणे शहराला १३ वा क्रमांक मिळाला. मात्र ११ व १२ या क्रमाकांवर लहान शहरे आहेत, त्यामुळे मेट्रो सिटीमध्ये पुण्याचा क्रमांक ११ वाच आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.