पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:43 AM2022-08-16T10:43:40+5:302022-08-16T10:43:57+5:30
महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले
पांडुरंग मरगजे.
धनकवडी : देशाचे अमृत महोत्सवी वर्ष हे भारतीय युवकांच्या स्वप्नपूर्तीचे वर्ष ठरले. धनकवडी येथील गिर्यारोहक स्मिता घुगेने राष्ट्रकुलला शोभेल अशी कामगिरी करत लडाखमधील 'खरदुंगला पास' येथे १७,९८२ फूट उंचीवर ७५ फूटी तिरंगा फडकवून आगळा विक्रम केला. ३६० एक्सप्लोररचे गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता हीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सोबत घेऊन तिरांगा फडकावला; इतकेच नाही तर या अतिउंच ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.
धनकवडीच्या गिर्यारोहक स्मिता दुर्गादास घुगे हिने १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सहा वाजता जम्मू आणि काश्मीरच्या लडाख जिल्ह्यातील खरदुंगला पास या १७,९८२ फूट उंचीच्या जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर ७५ फुटी तिरंगा फडकवला. ही कामगिरी बजावताना स्मिता हिने आपल्यासोबत महाराष्ट्राचे स्फुर्तीदैवत शिवरायांची मूर्ती सोबत नेली होती. या मूर्तीच्या साक्षीने तीने तिरंगा फडकवला; तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करत खरदुंगला पास येथे अत्यंत आगळ्या पद्धतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.
या मोहिमेदरम्यान ३६० एक्सप्लोररतर्फे ७ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्मिता घुगे हिने भारत पाकिस्तान सीमारेषेवरील टिठवाल, कारगिल मेमोरियल, पोंगोन लेक इथेसुद्धा ७५ फूटी तिरंगा ध्वज फडकवला. गिर्यारोहक स्मिता घुगे हिने याआधी आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमांजारो शिखरावर तसेच शिवजयंती उत्सवाच्या दिवशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी एव्हरेस्ट बेस कँप लोबुचे येथे ७५ फुटी तिरंगा फडकवण्याचा पराक्रम केला होता.
"देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खरदुंगला पास येथे ७५ फुटी तिरंगा फडकवण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. अत्यंत प्रतिकूल वातावरणाला तोंड देत मी हे साध्य करू शकले कारण शिवरायांची प्रेरणा माझ्या मनात सदैव जागृत होती. मार्गदर्शक आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले. माझे हे यश मी महाराजांना समर्पित करत असल्याची भावना घुगे हिने व्यक्त केली आहे.''