स्मिताची ६,२०० मीटर उंचीच्या माउंट मेरावर यशस्वी चढाई; तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:06 AM2024-05-20T11:06:59+5:302024-05-20T11:07:47+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची धगधगती प्रेरणा घेऊन काठी चढाई यशस्वीरित्या पार केली
पांडुरंग मरगजे
धनकवडी : शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठमाेळ्या माणसांचं प्रेरणास्थान. शिवछत्रपतीच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून गिर्याराेहण क्षेत्रात काम करणाऱ्या स्मिता दुर्गादास घुगे हिने सुमारे ६ हजार २०० मीटर उंचीवर असलेल्या नेपाळच्या माउंट मेरा शिखरावर तिरंगा फडकवत छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीदिनी (दि. १४ मे) मानवंदना दिली.
अत्यंत प्रतिकूल वातावरणात कठीण चढाई करताना मनात सदैव छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची धगधगती प्रेरणा आत्मविश्वास देत असल्याचे स्मिताने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. धनकवडी येथील स्मिताचे ७ खंडांमधील ७ उंच शिखर सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून, त्यासाठी ती अहोरात्र मेहनत घेत आहे. या दृष्टीने त्यांचे मार्गक्रमण सुरू असून, या आधी स्मिताने आफ्रिका खंडातील सगळ्यांत उंच शिखर ज्याची उंची १९ हजार ३४१ फूट (५८९५ मी.) आहे अशा माउंट किलीमांजारो येथेदेखील ७५ फूट तिरंगा ध्वज फडकवित इतिहास घडविला होता.
सोबतच आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवरदेखील स्मिताने यशस्वी चढाई केली आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प ज्याची उंची ५ हजार ३६४ मी (१७५९८फूट) तिथे ४० फूट भगवा ध्वज आणि ७५ फूट तिरंगा ध्वज फडकावून भारताचा अमृत महोत्सव आणि शिवजयंती साजरी केली होती.
काेट
‘360 एक्सप्लोरर’चे आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम केली. माझ्यासाठी व पूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अत्यंत त्रासात व प्रतिकूल वातावरणात महाराजांची प्रेरणा माझ्या मनात होती. माझे कुटुंब, आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम लोकांमुळे हे यश मिळाले आहे. माझ्यासोबत डॉ. सीमा अजय पाटील (डहाणू) यांनी साथ दिली. सोबत छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटाचे पोस्टर झळकवताना अत्यानंद झाला, माझे हे यश महाराजांना मी समर्पित करत आहे." - स्मिता दुर्गादास घुगे, सुप्रसिद्ध गिर्यारोहक, धनकवडी.