वैकुंठ स्मशानभुमीमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा निर्माण झाला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:21+5:302021-05-05T04:20:21+5:30
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येथील ...
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येथील विद्युत आणि गॅस दाहिनीसोबतच पारंपरिक पद्धतिने अंत्यविधी केले जात आहेत. त्यामुळे येथील अंत्यविधींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धुराचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून आवाज उठविल्यानंतर पालिका प्रशासनाने चिमण्या बद्दलण्याबाबत तसेच सुधारणा करण्याबाबत पाऊल उचलले आहे. बुधवारी महापौर, अतिरिक्त आयुक्त विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसह वैकुंठ स्मशानभूमीची पाहणी करणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी वैकुंठ स्मशानभूमीतील चिमणीतून काळाकुट्ट धूर बाहेर येत असल्याबाबत फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. विद्युत दाहिनीच्या चिमणीची रूंदी कमी असून धूरासोबत बाहेर पडणारी राख थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ही राख नवी पेठ, सदाशिव, नारायण, कर्वे रोड, शास्त्री रोड भागातील इमारतींवर जाऊन थांबत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. उत्तम दर्जाचे यंत्र बाजार उपलब्ध असून त्याची खरेदी करावी असेही त्यांनी नमूद केले होते.
त्यांच्या या पोस्टनंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीनं दखल घेत पालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच धुराची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले..अतिरिक्त आयुक्त डाॅ कुणाल खेमणार यांनीही फोन करून स्वतः आणि विद्युत विभागाच्या अधिकारी वर्गाने केलेल्या कामाची तसेच शहरातील जैव-वैद्यकीय कचरा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली.