धावत्या बसच्या पुढील बाजूने धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:48 AM2018-09-30T02:48:49+5:302018-09-30T02:49:23+5:30
यापूर्वीही पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बस काही वर्ष जुन्या आहेत. शनिवारी इंजिनमधून धूर आलेली बस
पुणे : धावत्या बसच्या पुढील बाजूने अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने शनिवारी दुपारी लक्ष्मी रस्त्यावर एकच धावपळ उडाली. चालकाने तत्काळ ही बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान, मार्च महिन्यातच ताफ्यात आलेल्या नवीन मिडी बसमधूनच धूर आल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) देखभाल-दुरुस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात मार्च महिन्यापासून दोन महिन्यांत सुमारे २०० नवीन मिडीबस दाखल झाल्या आहेत. यापैकीच एक बस शनिवारी दुपारी शनिपार ते निलज्योती या मार्गावर धावत असताना लक्ष्मी रस्त्यावर दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या वेळी बसच्या पुढील बाजूने इंजिनातून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. चालक व प्रवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ते तातडीने बसमधून उतरले. धुराचे लोट वाढत गेल्याने प्रवाशांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात गाडी दाखल झाली. पाण्याची फवारणी करून धुरावर नियंत्रण मिळविण्यात आले. पीएमपी अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली. इंजिनातील तांत्रिक बिघाडामुळे ते गरम झाले. त्यामुळे धूर आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
जुन्या बस
यापूर्वीही पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बस काही वर्ष जुन्या आहेत. शनिवारी इंजिनमधून धूर आलेली बस सहा महिन्यांपूर्वीच ताफ्यात दाखल झाली आहे. या मिडीबसेसच्या देखभाल-दुरुस्तीबाबतही अनेक तक्रारी आल्या आहेत. या बसचेही अनेकदा ब्रेकडाऊन झाले आहे. डिजिटल फलक, दरवाजे यांसह अन्य तांत्रिक यंत्रणाही काम करत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यातच आता इंजिनातून मोठ्या प्रमाणावर धूर येण्याची घटना शनिवारी घडली. नवीन बसबाबतही अशा घटना घडू लागल्याने प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. या घटनेने पीएमपीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामावर प्रवाशांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.