धुव्वाधार पावसाने पुन्हा त्रेधातिरपीट

By admin | Published: March 30, 2015 05:34 AM2015-03-30T05:34:32+5:302015-03-30T05:34:32+5:30

सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती.

Smoke rains again | धुव्वाधार पावसाने पुन्हा त्रेधातिरपीट

धुव्वाधार पावसाने पुन्हा त्रेधातिरपीट

Next

पिंपरी : सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शहर आणि मावळ व मुळशी तालुक्यांत हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाची थांबून थांबून संततधार कायम होती.
पावसामुळे नागरिकांना साप्ताहिक सुटीचा आनंद घेता आला नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून तळी तयार झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली.
सकाळपासून रविवारी वातावरण ढगाळ होते. अंधकारमय वातावरण होते. तापमानात कमालीची वाढ झाली होती. दुपारी चारच्या दरम्यान आकाशात काळे ढग जमा झाले. परिसरात ढगांनी गर्दी केली होती. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सोबत जोरदार वारे वाहत होते.
निगडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नेहरुनगर, रहाटणी आदी ठिकाणी त्याचबरोबर मावळ आणि मुळशी तालुका परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गारा- वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे थोड्याच वेळेत रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. सर्वच भुयारी मार्गांत गुडघाभर पाणी साचले.
घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची आणि सुटीची मजा घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबीयांची, दुचाकीस्वारांची पावसाबरोबरच सुटलेल्या वाऱ्यामुळे दैना उडाली. पथारीवाले, फेरीवाले, विक्रेते आणि दुकानदारांचीही तारांबळ उडाली. साहित्याची जुळवाजुळव करताना त्यांची त्रेधा उडाली.
शहरातील काही भागांत झाड्याच्या फांदा तुटून पडल्या. वादळी पावसात कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये, यासाठी अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिकात पाणी साचले. मार्र्च महिन्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हवालदिल आहेत.
सामना पाहता आला नाही
शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने काही भागांतील वीज गुल झाली. पिंपळे गुरव, सांगवी, काळेवाडी, पिंपरी आदी भागांत वीज खंडित झाली. अनेक भागांत रविवारीही वीज गायब होती. अनेकांना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्याचा आनंद घेता आला नाहीसध्या शालेय आणि महाविद्यालयीन वार्षिक परीक्षा सुरू आहे. खंडित विजेमुळे त्यांना रात्री अभ्यास करणे शक्य झाले नाही. रात्री उकाडा आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. चिंचवड : उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच चिंचवड परिसरात सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊस कोसळला.
रविवारी सकाळपासून हवेत उष्मा होता. ढगांच्या गडगडाटासह दुपारी साडेचारला पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांचे हाल झाले. चाकरमान्यांनाही भिजत जावे लागले. बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले होते.
हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. यामुळे अनेकांची धांदल उडाली. साडेपाचला गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर शुकशुकाट होता. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी आडोशाला आश्रय घेतला. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने अनेक जण वाहने ढकलताना दिसत होते. किवळे : रावेत, किवळे परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर देहूरोड व चिंचोली परिसरात मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने सिमेंट पत्र्याच्या घरात राहणारे नागरिक भयभीत झाले होते. किवळे परिसरातही थोड्या प्रमाणात गारा पडल्या.
शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, शेतातील फुलोऱ्यावर (कणसावर) आलेली बाजरी, तसेच चारापिके शेतात आडवी झाली आहेत. गव्हाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. गहुंजे, सांगवडे भागात जनावरांसाठी राखून ठेवलेल्या शेतातील गवताचे मोठे नुकसान झाले आहे.
देहूरोड, चिंचोली परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह व गारांच्या पावसाने हजेरी लावली. अर्धा तास गारांचा पाऊस पडल्याचे चिंचोली येथील विठ्ठल जाधव, बाळासाहेब जाधव यांनी सांगितले .
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गानजीक दोन ठिकाणी झाडे पडली होती, तर विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. देहूरोड - विकासनगर रस्त्यावर महावितरणचा खांब कोसळला आहे. त्यामुळे श्रीकृष्णनगर भागातील वीजपुरवठा शनिवार रात्रीपासून सुरळीत झालेला नाही.
आढले बुद्रुक : वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी दुपारपासून पवन मावळातील आढले बुद्रुक,आढले खुर्द, चांदखेड, दिवड, डोणे, ओव्हळे, राजेवाडी, पाचाणे, पुसाणे, कुसगाव या दहा गावांसह वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३० तास उलटूनही रविवारी संध्याकाळपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता.
दोन दिवसांपासून वीज नसल्यामुळे या गावांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब वाकले, कोलमडून पडले. विद्युतवाहक तारा तुटल्या. त्यामुळे दोन दिवसांपासून ही गावे
अंधारात आहेत. वीज नसल्याने पीठगिरणी बंद होत्या. त्यामुळे नागरिकांना दळण दळण्यासाठी १५ किलोमीटर अंतरावरील परंदवडी - सोमाटणेला जावे लागले. वीजपुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Smoke rains again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.