कारवाई सुरू असतानाही सार्वजनिक ठिकाणी होतेय धूम्रपान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:13+5:302021-01-08T04:34:13+5:30
शहरात बसस्थानके, प्रमुख चौक, लहान-मोठे हॉटेल, महाविद्यालयाबाहेरील परिसर, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये धूम्रपान करताना नागरिक आढळून येतात. या नागरिकांमुळे लहान मुले, ...
शहरात बसस्थानके, प्रमुख चौक, लहान-मोठे हॉटेल, महाविद्यालयाबाहेरील परिसर, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये धूम्रपान करताना नागरिक आढळून येतात. या नागरिकांमुळे लहान मुले, ज्येष्ठ महिला, निर्व्यसनी व्यक्तींना धोका असतो. त्यांना विनाकारण त्या धुराचा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. सद्यस्थितीत शहरात अनेक ठिकाणी सर्रास धूम्रपान करत असल्याचे चित्र दिसले.
महानगरपालिकेच्या घनकचरा आणि व्यवस्थापन विभागाकडून कारवाई केली जाते. त्याबरोबर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार अन्न औषध प्रशासन, बसस्थानक परिसरात आगारप्रमुख, शाळा परिसरात मुख्याध्यापक, महाविद्यालय परिसरात प्राचार्य यांनाही देण्यात आले आहेत.
चौकट
गेल्या वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि धूम्रपान करणे याअंतर्गत १ जानेवारी २०२० ते ६ जानेवारी २०२१ या कालावधीत १ हजार ६६७ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर २ लाख २३ हजार ६३५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
चौकट
महाविद्यालयाच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. पूर्वीपासूनच कोणालाही धूम्रपान करू दिले जात नाही. आवारात कोणी धूम्रपान करताना दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.
विनायक सोलापूरकर - प्राचार्य
सर परशुरामभाऊ महाविद्यालय
चौकट
स्वारगेट परिसरात कोणीही आढळून येत नाही. आमचे एसटी कर्मचारी वारंवार सूचना देत असतात. आम्हीही धूम्रपान करण्यास सक्त मनाईचे फलक लावले आहेत. धूम्रपान करताना दिसल्यास कारवाई केली जाते.
अनिल भिसे - आगारप्रमुख
स्वारगेट बसस्थानक
चौकट
बिडी सिगारेट ओढल्याचे धोके
बिडी, सिगारेट आणि हुक्क्याचा धूर श्वसन मार्गातून शरीरात जातो. त्यामधील निकोटिन हा त्रासदायक घटक आहे. त्याचा परिणाम फुफ्फुसावर आणि रक्तवाहिन्यांवर होतो. त्यामुळे घसा, फुफ्फुस आणि तोंडाचे कर्करोग होतात. सिगारेट ओढणाऱ्या लोकांमुळे न ओढणाऱ्या लोकांनाही धोका असतो.
गर्भावस्थेत असणाऱ्या स्त्रियांनी धूम्रपान केल्यास बाळाला टीबी किंवा न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. दुर्देवाने चित्रपटातच अभिनेता स्टाईलमध्ये धूम्रपान करत असतो. त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे.
मिलिंद भोई,
कान,नाक घसा तज्ज्ञ