शिरूरमध्ये लसीकरणाचा सुरळीत पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:26+5:302021-04-29T04:07:26+5:30
शिरूर : तालुक्यातील २४ कोविड लसीकरण आरोग्य केंद्रांवर ६९ हजार २५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले ...
शिरूर : तालुक्यातील २४ कोविड लसीकरण आरोग्य केंद्रांवर ६९ हजार २५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये दि. १६ जानेवारी रोजी तालुक्यात लसीकरण सुरू झाल्यापासून ६१ हजार ९५५ नागरीकांनी पहिला डोस, तर ७ हजार चारशे सत्तर नागरिकांनी दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी दिली.
शिरूर तालुक्यात एकून २४ ठिकाणी कोरोना
लसीकरण केंद्रे असून, त्यामध्ये आठ प्राथमिक आरोग्य केंद्र
करडे, कवठे, केंदूर, टाकळी हाजी, रांजणगाव गणपती, निमोणे, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे या गावात आहेत. तसेच शिक्रापूर व शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात लस दिली जात असून लसीकरणासाठी पंधरा उपकेंद्र आहेत त्यामध्ये कारेगाव, मलठण, कान्हुर मेसाई, पाबळ, धामारी,
पिंपळे जगताप, जांबुत, निर्वी, आंबळे, रांजणगाव सांडस, वडगाव रासाई, इनामगाव, गणेगाव दुमाला, निमगाव म्हाळुंगी अशी गावे आहेत. यातील प्रत्येक केंद्रावर सरासरी दररोज १२५ जणांना कोविड लसीकरण करण्याची व्यवस्था केली जात असून, प्रशासनाकडून योग्य पद्धतीने सर्व लसीकरण केंद्रांना लस पुरवठा होत असल्याने लसीकरण चालू झाल्यापासून एक ही केंद्र बंद राहत नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात आरोग्य यंत्रणेच्या वतीने कोविड लसीकरण केंद्रांमध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्था करण्यात आली असून लस दिल्यानंतर प्रत्येक नागरिकांना काही वेळ वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणी खाली ठेवून लसीकरणामुळे काही दुष्परिणाम होतो की नाही, याची चाचपणी केली जाते. त्यामुळे नागरिकांची योग्य रितीने काळजी घेण्याचे काम वैद्यकीय विभागाकडून घेतली जात असल्याचे लसीकरणाचा पहिला डोस घेतलेले नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव यांनी सांगितले.
२८ शिरुर
शिरुर ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करताना नागरिक.