एसएमएस आले; नाव गायब
By admin | Published: June 28, 2015 12:05 AM2015-06-28T00:05:45+5:302015-06-28T00:05:45+5:30
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याचे एसएमएस आले. पण, त्यातील काही विद्यार्थ्यांना एसएमएस
पिंपरी : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याचे एसएमएस आले. पण, त्यातील काही विद्यार्थ्यांना एसएमएस येऊनही प्रवेश यादीत नावच नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन दिवसांत याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या. या विद्यार्थ्यांना हा एसएमएस कसा आला, याबाबत केंद्रीय प्रवेश समितीने नेमलेल्या मार्गदर्शन केंद्रांवरही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दुसऱ्या यादीची वाट बघा असेच अधांतरी उत्तर त्यांना मिळाले.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशाची आॅनलाईन गुणवत्ता यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर यादीत समावेश असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या महाविद्यालयाचा कोड नंबर पाठविण्यात आला.
तांत्रिक बाजू एमकेसीएलतर्फे सांभाळली जात आहे. विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्याची जबाबदारीही एमकेसीएलवर आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. मात्र, या यादीत एसएमएस आलेल्या काही विद्यार्थ्यांची नावेच नसल्याचे समोर आले आहे.
शनिवारी पहिल्या यादीतील प्रवेशाचा अखेरचा दिवस असल्याने गरवारे महाविद्यालयात चौकशीसाठी आले होते. (प्रतिनिधी)
अशाही तक्रारी... अडचणी...
पहिल्या यादीतील प्रवेशाचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू होती. पण, त्याचबरोबर अनेक तक्रारीही येत होत्या. प्रवेशावेळी काही अडचणींना विद्यार्थी व पालकांना सामोरे जावे लागले. एक विद्यार्थी जयपूर, तर दुसरा बीड येथून प्रवेशासाठी आले होते. मात्र, त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नव्हता. प्रवेशावेळी दाखला आवश्यकच असल्याने त्यांना सुरुवातीला प्रवेश मिळणार नाही, असे सांगण्यात आले.
पण, काही वेळाने या अडचणीतून मार्ग काढण्यात आला. तसेच मूळ जातप्रमाणपत्र नसल्यामुळेही काही विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. काही विद्यार्थिनी लांबचे महाविद्यालय मिळाले असल्याच्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश हवा, ते विनानुदानित आहे, वसतिगृहाची सुविधा नाही, पाहिजे तो विषय नाही अशा विविध तक्रारी काहींनी केल्या. पण, माहितीपुस्तिकात पुरेशी माहिती देण्यात आली असून, ती नीट न वाचताच पसंतिक्रम भरल्याने या अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
तन्वी घोरपडे या विद्यार्थिनीलाही पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचा एसएमएस आला होता. पण, प्रत्यक्ष यादीत तसेच प्रवेशाच्या संकेतस्थळावर तपासणी केले असता तिचे पहिल्या यादीत नाव नसल्याचे समोर आले. ती वडिलांसह गरवारेमध्ये चौकशी करण्यासाठी आली असता तेथील केंद्रीय समितीच्या प्रतिनिधींनाही ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे ती गोंधळून गेली होती. तिला दुसऱ्या यादीची वाट पाहण्यास सांगण्यात आले. ‘दोन दिवसांपासून याबाबत चौकशी सुरू आहे, पण काहीच कळत नाही. एसएमएस येऊनही यादीत नाव नाही,’ असे तन्वीने सांगितले.