पुण्यात तस्करी करुन आणलेला सर्वात मोठा सोन्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 08:02 PM2018-08-16T20:02:54+5:302018-08-16T20:18:32+5:30
दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी करुन आणण्यात येत असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती़.
पुणे : दुबईहून तस्करी करुन आणलेले ३ कोटी रुपयांचे १० किलो सोन्याची बिस्कीटे सीमा शुल्क विभागाने गुरुवारी विमानतळावर पकडले़. पुणे शहरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे़. प्रवाशाने विमानतळावर उतरल्यानंतर तेथील स्वच्छतागृहातील कचरा पेटीमध्ये ही ८६ सोन्याची बिस्किटे टाकलेली आढळून आली आहेत़.
दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी करुन आणण्यात येत असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती़. त्यांनी विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला याची कल्पना दिली़. त्यानुसार दुबईहून येणाऱ्या स्पाईसजेट विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली़. परंतु, त्यांच्याकडे काहीही संशयास्पद मिळाले नाही़. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानतळावर सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली़.तेव्हा प्रवासी विमानातून पहिल्या मजल्यावर उतरुन तेथून खाली तपासणीसाठी येतात़. त्या पहिल्या मजल्यावर पुरुषांच्या स्वच्छतागृह आहेत़. तेथे तपासणी केली असता तेथील कचरा पेटीत (डस्टबीन)मध्ये मोबाईलच्या चार मोठ्या कव्हरमध्ये ही ८६ सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले़. त्याचबरोबर २ सोन्याची वेढणीही त्यात होती़. या बिस्किटांचे वजन १०़.१७५ किलो असून त्याची किंमत ३ कोटी ९ लाख, ३४ हजार ६७५ रुपये इतकी आहे़.
यापूर्वी पुण्यात १ कोटी रुपयांचे ७ किलोपर्यंतचे तस्करी करुन आणलेले सोने सीमा शुक्ल विभागाने पकडले होते़. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले़.