बिबट्याच्या कातड्याची तस्करी,दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:09+5:302021-03-20T04:11:09+5:30
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या कातडीच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने कारवाई करत १० लाख २५ ...
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या कातडीच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने कारवाई करत १० लाख २५ हजार रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे आणि पल्सर दुचाकीसह जेरबंद केले आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश तावसकर यांना दुपारी साडेबाराचे सुमारास शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रस्त्यालगत त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालय जवळ काही युवक बिबट्याच्या कातड्याची विक्री करत तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना माहिती देत पुढील कारवाईसाठी सहाय्यक निरीक्षक विक्रम साळुके, पोलीस हवालदार सहदेव ठुबे, अमरदिन चमनशेख, पोलीस नाईक सचिन मोरे, संतोष शिंदे, योगेश नागरगोजे, मिलिंद देवरे, किशोर शिवणकर, निखील रावडे, अशोक केदार, राहुल वाघमोडे, प्रताप कांबळे, प्रतिक जगताप या पथकाला त्या ठिकाणी पाठवत सापळा लावला. या दरम्यान त्या ठिकाणी दोन संशयित युवक दुचाकीहून आल्याचे दिसताच पोलीस पथकाने त्या युवकांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील पिशवीची पाहणी केली. त्या पिशवीमध्ये काळे ठिपके असलेले बिबट्याचे कातडे आढळून आले. पोलिसांनी त्या दोघा युवकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून अंदाजे दहा लाख २५ हजार रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे व दुचाकी जप्त केली असून दत्तात्रय देवराम शिंदे (वय ३०, रा. पळवे ता. पारनेर जि. अहमदनगर) व दादासाहेब रामदास थोरात (वय ३४ वर्षे रा. वाळवणे ता. पारनेर जि. अहमदनगर सध्या रा. शिरूर ) अशी अटक केलेल्या दोघा युवकांची नावे असून त्यांच्यावर वन्य जीव अधिनियमन अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या कातडीच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत वाघाचे कातडीसह जेरबंद केले.