काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

By नितीश गोवंडे | Published: June 17, 2024 06:38 PM2024-06-17T18:38:06+5:302024-06-17T18:38:17+5:30

बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या

Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road | काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

पुणे: गोव्यात विक्रीची परवानगी असलेल्या विदेशी मद्याची आंब्यांच्या पेट्यांमधून तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणला. बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या, तसेच मालवाहू वाहन (पिकअप) असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली.

नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे आणि महेश गुलाबराव औताडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी संशय न येण्यासाठी गोव्यातील मद्याच्या बाटल्या पिकअप वाहनात ठेवलेल्या आंब्याच्या पेटीत लपवल्याचे उघडकीस आले. गोव्याहून नगरकडे पिकअप वाहन निघाले होते. उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह रजपूत, उपअधिक्षक उत्तम शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक माेरगाव - सुपा रस्त्यावर गस्त घालत होते. गाेव्यातील मद्याची तस्करी एका वाहनातून करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील दौंड विभागाच्या पथकाला मिळाली.

त्यानंतर मुर्टी गावाजवळ पथकाने एका मोटारीसह पिकअप वाहनाची तपासणी केली. चौकशीत चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने पाहणी केली. तेव्हा पिकअप वाहनात मद्याच्या बाटल्या सापडल्या. आरोपींनी संशय येऊ नये म्हणून आंब्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. पथकाने वाहनातील पेट्या बाहेर काढल्यानंतर मद्याची खोकी सापडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक, जवान शुभम भोईटे, केशव वामने यांनी ही कारवाई केली.

Web Title: Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.