Water pollution : गोगलगायीच्या म्युकसने शोधला पाण्यातील पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:10 PM2022-11-01T13:10:45+5:302022-11-01T13:11:01+5:30
ग्रामीण भागात कोणत्या पाण्यात पारा आहे, ते लगेच शोधता येणार...
- श्रीकिशन काळे
पुणे : जायंट आफ्रिकन स्नेल म्हणजेच अचॅटीना फुलिका या परदेशी गोगलगायीच्या म्युकसपासून (चिकट द्रव पदार्थ) सिल्व्हर बायो नॅनो कॉम्पोजिट्स तयार केले. त्यापासून दूषित पाण्यातील पारा हा घातक घटक शोधण्यासाठी मदत होणार आहे. पाण्यात म्युकस टाकले की, पाण्याचा रंग बदलतो आणि त्यात पारा असल्यास ते दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागात कोणत्या पाण्यात पारा आहे, ते लगेच शोधता येणार आहे. तसेच फळे, भाज्या, माती यामधील पाराही शोधता येईल.
श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील प्राणीशास्र संशोधन केंद्र प्रयोगशाळेत (जुन्नर) हे पाण्यातील पाऱ्यांचे प्रमाण तपासले आहे. सी-मेट संस्थेचे माजी महासंचालक डॉ. दिनेश अंमळनेरकर, शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. आर. डी. चौधरी आणि डॉ. प्रमोद माने यांनी हे संशोधन केले. स्प्रिंजर- नेचरच्या ई- मटेरिअल्स या संशोधन जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
डॉ. चौधरी म्हणाले की, आफ्रिकन गोगलगाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक असून, सर्व पिकांचे नुकसान करते. मात्र, याच गोगलगायीच्या म्युकसचा वापर करून पाण्यातील पारा तपासण्याचे सोल्यूशन्स बनवले. पिण्याच्या पाण्याबाबत भारतात फारशी जागृती नाही. शहरात, ग्रामीणमध्ये नागरिक बोअरवेल, विहिरीतील पाणी पितात. त्यात पारा असतो. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी तपासून देण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचे आहे.
पारा शरीरात गेल्यामुळे ताप येणे, मळमळ होणे, छातीत दुखणे आदी त्रास होतो. त्याचप्रमाणे पाऱ्यांचे प्रमाण वाढत गेल्यानंतर किडनी निकामी होते. पचनसंस्था बिघडते. त्यातून आजार वाढून लघवीतून रक्त येते. रक्त असलेले जुलाब होणे, रक्तदाब वाढणे, रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर रुग्णाचा मृत्यू होतो. पाणी सोल्युशनमध्ये टाकल्यास त्याचा रंग ‘डार्क ब्राऊन’ होतो. त्यामुळे अत्यल्प दरात पाण्यात पाऱ्याचे प्रमाण तपासणे शक्य होते.
- डॉ. प्रमोद माने
पाण्यात पारा असेल तर ते पिऊ नये. याविषयी नागरिकांमध्ये माहिती नाही. पारा शरीरात गेल्यास अवयवांना धोका होतो. आमच्या संशोधनामुळे नागरिकालासुध्दा पाण्यातील पाऱ्याचे प्रमाण तपासता येईल. त्यासाठी केवळ एक रुपया एवढाच खर्च येतो.
- डॉ. दिनेश अंमळनेरकर, माजी महासंचालक, सी-मेट