कर्करोगावर मात करण्यात आता गोगलगायीची श्लेष्मा ठरतेय गुणकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:36 AM2023-12-20T11:36:58+5:302023-12-20T11:37:55+5:30
प्रथमच प्रतिजैविक आणि कर्करोगावर औषध या गुणधर्मांसह डासांच्या अळीनाशक म्हणून काम करणारी एक बायो-नॅनोकॉम्पोझिट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे कर्करोगावर एक चांगले औषध निर्माण होऊ शकणार आहे....
- श्रीकिशन काळे
पुणे : शेतीला नुकसानकारक असलेल्या आफ्रिकन स्नेलच्या (गोगलगाय) श्लेष्मापासून (म्यूकस) कर्करोगविरोधी औषध शोधण्याचे कार्य पुण्यातील शास्त्रज्ञांनी केले आहे. ही कामगिरी जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यांनी प्रथमच प्रतिजैविक आणि कर्करोगावर औषध या गुणधर्मांसह डासांच्या अळीनाशक म्हणून काम करणारी एक बायो-नॅनोकॉम्पोझिट प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे कर्करोगावर एक चांगले औषध निर्माण होऊ शकणार आहे.
हे संशोधन बायोमेड सेंट्रल आणि स्प्रींजर-नेचर या प्रख्यात आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या ‘कॅन्सर नॅनोटेक्नॉलॉजी’ या अतिशय प्रतिष्ठित रिसर्च जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले. या शास्त्रज्ञांमध्ये जुन्नर कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ. आर. डी. चौधरी, डॉ. दीपाली माने, डॉ. प्रमोद माने, आदित्य चौधरी, अशोक खडसे यांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या चमूने उल्लेखनीय प्रतिजैविक, कर्करोगावरील उपाय, अँटी ऑक्सिडंट आणि डासांच्या अळ्यानाशक गुणधर्मांसह गोगलगायच्या श्लेष्मापासून (म्यूकस) तांबे आणि कोबाल्ट ऑक्साईड बायो-नॅनोकॉम्पोझिटचे संशोधन केले.
प्रा. डॉ. चौधरी म्हणाले की, बायो-नॅनोकॉम्पोझिट्सच्या संशोधनासाठी या अभ्यासात आम्ही अचॅटिना फुलिकाच्या श्लेष्माचा वापर केला, जो एक चिकट स्राव आहे व त्यामध्ये अल्प प्रमाणात प्रथिने असतात. गोगलगायीच्या श्लेष्मामध्ये असलेले जैविक घटक जैव-रासायनिक संयुगाच्या संश्लेषणादरम्यान मदत करतात आणि त्यावरील आवरण म्हणून काम करतात. ही गोगलगाय जमिनीवर राहणारी असून, या स्रावाचा उपयोग चालताना घर्षण टाळण्यासाठी वंगण म्हणून करते. गोगलगायची ही प्रजाती वनस्पती, फळे, भाजीपाला इ. खातात व ती शेती तसेच इतर पिकांसाठी अतिशय नुकसानकारक घटक म्हणून काम करते.
कर्करोगविरोधी गुणधर्म :
सध्याच्या बायो-नॅनोकॉम्पोझिटमध्ये स्टॅफिलोकोकस ऑरियस, स्यूडोमोनास एरोजिनोसा ह्या प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या (अँटिबायोटिक रेझिस्टंट) व मानवात विविध रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंविरुद्ध अतिशय परिणामकारक असे जिवाणू प्रतिबंधक गुणधर्म दिसले. तसेच मानवी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग तसेच आतड्यांच्या कर्करोगाच्या पेशींविरुद्ध अत्यंत आश्वासक असे कर्करोगविरोधी गुणधर्म दिसले.
मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका विषाणू या आणि यांसारख्या इतर रोगांची संख्या वाढवणाऱ्या डासांच्या अळ्यांचा नायनाट करणारी प्रचंड क्षमता बायो-नॅनोकंम्पोझिट प्रणालीत आहे.
- अशोक खडसे, शास्त्रज्ञ
अभ्यासातील बायो-नॅनोकॉम्पोझिट्स त्याच्या उत्कृष्ट औषधी उपयोगांसह, कोणत्याही प्रकारच्या वनस्पतींना आणि मानवी पेशींना हानी पोहोचवत नाहीत. या अभ्यासादरम्यान तांबे आणि कोबाल्ट ऑक्साईड बायो-नॅनोकॉम्पोझिट्सचे विविध प्रयोग गहू या पिकावर करून, गव्हाच्या उगवण क्षमतेवर तसेच त्यातील हरितद्रव्य, मुळांची व खोडांची वाढ इत्यादी घटकांचा सखोल अभ्यास केला. त्याच्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. त्याचप्रमाणे मानवी शरीरातील उपयोगी पेशींवर प्रयोग करून त्यापासून कोणताही दुष्परिणाम समोर आला नाही. त्यामुळे ही बायो-नॅनोकॉम्पोझिट प्रणाली ही पर्यावरणपूरक आहे.
- प्रा. डॉ. प्रमोद चौधरी, शास्त्रज्ञ