खोडद ३ महिन्यांत १०० जणांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:07+5:302021-07-28T04:12:07+5:30
-- अशोक खरात : खोडद : मे महिन्यापासून जुलै पर्यंत या तीन महिन्यांच्या काळात सुमारे १०० रुग्णांना विविध विषारी ...
--
अशोक खरात : खोडद : मे महिन्यापासून जुलै पर्यंत या तीन महिन्यांच्या काळात सुमारे १०० रुग्णांना विविध विषारी सापांचा दंश झाला आहे.सर्पदंश झालेल्या या १०० रुग्णांमध्ये घोणसने दंश केलेले ४७ रुग्ण आहेत.सर्पदंश झालेल्या या १०० रुग्णांचा जीव वाचविण्यात नारायणगाव येथील डॉ.सदानंद राऊत व डॉ.सौ.पल्लवी राऊत यांना यश आले आहे.
मे महिन्यात तीव्र उन्हाळा असल्याने या काळात अति उष्माघातामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळी गारव्याला साप बाहेर पडतात. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पाणी बिळात जाते व त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. या दरम्यान शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीची कामे करण्यात व्यस्त असतात. यावेळी शेतात कामे करत असताना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना सर्पदंश होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शेतात काम करत असतानाच सर्पदंशाचे होण्याचे प्रमाण अधिक आहे.
दरवर्षी वर्षभरात सर्पदंश झालेल्या १०० रुग्णांची वाढ होत असते, मात्र या यावर्षी फक्त तीन महिन्यांतच १०० जणांना झालेला सर्पदंश म्हणजे ही चिंतेची बाब आहे. यात घोणसने दंश केलेले रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्याखालोखाल नाग, मण्यार, फुरसे या विषारी सापांचे दंशाचे प्रमाण आहे.
डॉ. राऊत यांनी सुरू केलेल्या 'शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पाचे' जागतिक आरोग्य संघटना, सर्पदंश क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर्स यांच्याकडून जगभरातून कौतुक होत आहे. लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने देखील जगभरातील डॉक्टरांसाठी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नहर नार्सिंग होम मध्ये सर्पदंश उपचार पद्धतीविषयी प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्यात येणार आहेत.
--
टेबल
मागील तीन महिन्यांत विविध विषारी जातीच्या सापांचे दंश झालेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे - घोणस ४७ रुग्ण, फुरसे - ३ रुग्ण , चपट्या घोणस - ६ रुग्ण, नाग - ८ रुग्ण , मण्यार - ४ रुग्ण , माहिती नसलेले व खात्री न झालेले इतर ३२ रुग्ण , असे एकूण १०० रुग्णांना विषारी सापांचा दंश झाला आहे.
--
================================
कोणत्या सापाने दंश केला हे कसे ओळखावे?
नाग : नागाने दंश केलेल्या ठिकाणी सूज येते व वेदना होतात. डोके जड पडते, डोळ्यांच्या पापण्या उचलता येत नाहीत. बोलता येत नाही. शरीराला लुळेपणा येतो. श्वास बंद होतो.
मण्यार : पोट व छाती दुखते.उलटी होते.डोळे उघडता येत नाहीत.बोलता येत नाही.शरीराला लुळेपणा येतो.श्वास बंद होतो.
घोणस : घोणसने दंश केलेल्या ठिकाणी सूज येते तसेच फोड येतात.पोटात दुखते तसेच उलट्या व वेदना होतात.तोंडातून व लघवीतून रक्तस्त्राव होतो.जांघेत व काखेत गाठी येतात.रक्तदाब कमी होतो तसेच किडनी निकामी होते.
--
कोट १
"अलीकडच्या काळात शेतात घोणसचे प्रमाण वाढले आहे.प्रामुख्याने शेतात काम करणाऱ्या लोकांना घोणसचा दंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. शेतात काम करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.सर्पदंश झाल्यानंतर मंत्र तंत्र न करता रुग्णास थेट जवळच्या डॉक्टरांकडे न्यावे. शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पांतर्गत सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा मानस आहे." - डॉ.सदानंद राऊत, सर्पदंश तज्ज्ञ, नारायणगाव
--
कॅप्शन : घोणसने दंश केलेल्या आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील सागर अशोक वाघ या ९ वर्षाच्या चिमुरड्याचा डॉ.राऊत यांनी जीव वाचविला.