रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 07:54 PM2019-07-12T19:54:27+5:302019-07-12T19:55:58+5:30

साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली.

The snake found in the anganwadi center of Ravangaon | रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ

रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ

Next
ठळक मुद्देचिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील गावठाणातील अंगणवाडी केंद्रशाळेमध्ये बुधवारी (दि १०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली.
येथील अंगणवाडी केंद्रामध्ये सध्या २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु अंगणवाडीला वर्ग खोलीच नसल्याने रावणगाव ग्रामपंचायतीने एक खासगी खोली गेल्या एक वर्षापासून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली आहे.  त्याचे भाडेदेखील रावणगाव ग्रामपंचायत देत आहे. परंतु, या खोलीच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीला संरक्षक झापडी नसल्याने त्या ठिकाणाहून रात्रंदिवस उंदीर, घूस, पाली सतत वर्गाच्या आत-बाहेर प्रवेश करतात.
बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर काही मिनिटांतच पिवळ्या रंगाच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने अंगणवाडी सेविकांची एकच धावपळ उडाली. परंतु सापाने वर्गात प्रवेश करण्याआधी शाळा सुटली असल्याने अनर्थ टळला. सेविकांनी वर्गात साप आल्याची माहिती ग्रामस्थांना देताच काही तरुण धावत तेथे आले. त्यांनी चिमट्याच्या साह्याने त्या सापाला पकडून एका शेतामध्ये सोडून दिले.
त्यानिमित्त येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अंगणवाडी केंद्राला शासनाने नवीन वर्ग खोली बांधण्यासाठी ८ लाख ५० हजार एवढा निधी मंजूर केला आहे. परंतु जोपर्यंत नवीन वर्ग खोली बांधली जात नाही, तोपर्यंत या निरागस चिमुकल्यांना अशा साप, उंदीर आणि घुशींच्या साम्राज्यातच आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागणार आहे.

---------------
पंधरा दिवसांत बांधकाम सुरू
नवीन वर्ग खोलीच्या बांधकामासाठी शासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे टेंडर पास करून येत्या पंधरा दिवसंतच येथील अंगणवाडीच्या वर्ग खोलीचे बांधकाम सुरू करण्यात येईल.  
- प्रवीण माने
(बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद पुणे)

------------
शासनाकडे पाठपुरावा... 
रावणगाव गावठाणातील अंगणवाडी वर्ग खोलीच्या बांधकामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. 
 - ललित आटोळे, (माजी सरपंच, रावणगाव)


   

Web Title: The snake found in the anganwadi center of Ravangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.