कोरोना सेंटरच्या भिंतीवर साकारली सापशिडी, टेडीबेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:39+5:302021-08-22T04:12:39+5:30
कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात धृव प्रतिष्ठान टिटेघर यांनी सर्व सुविधा असलेला सुसज्ज वॉर्ड ...
कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात धृव प्रतिष्ठान टिटेघर यांनी सर्व सुविधा असलेला सुसज्ज वॉर्ड तयार केला आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे यांनी विविध सामाजिक संघटना कोविड सेंटरसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देताना धृव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी बाल कोविड वार्डसाठी ध्रुव संस्थने मदत करून वार्ड दत्तक घेण्यासाठी विंनती केली होती.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी वार्ड सुशोभीकरण व आतील वार्ड रचना करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून १ ते १० वयोगटातील मुलांची आवड लक्षात घेऊन व मुलांची हॉस्पिटलची भीती घालविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने बाल कोविड वार्डची रचना केली आहे. भिंतीची रंगरंगोटी आणि मुलांसाठी खेळांच्या साहित्याबरोबरच संभाव्य कोरोनाग्रस्त मुलांना पौस्टिक आहार उपलब्ध ठेवला जाणार आहे. ध्रुव प्रतिष्ठानने तयार केलेल्या बाल कोविड वार्डचे आज उपजिल्हा रुग्णालयाकडे भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते फित कापून हस्तांतरण करण्यात आले.
या वेळी डॉ. आनंद साबणे, डॉ. लिंगेश्वर बिरूळे, पत्रकार सारंग शेटे, अमोल मुऱ्हे, रवी कंक, सचिन देशमुख, नीलेश खरमरे, पांडुरंग शिवतरे, राहुल खोपडे उपस्थित होते. या वेळी रुग्णालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.