वाहनांखाली सापडून होतोय सापांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:36+5:302021-08-19T04:12:36+5:30

खोडद : सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. पावसाचे पाणी बिळात गेल्याने साप बिळातून बाहेर येऊन नवीन जागा शोधण्याच्या ...

Snakes are found dead under vehicles | वाहनांखाली सापडून होतोय सापांचा मृत्यू

वाहनांखाली सापडून होतोय सापांचा मृत्यू

googlenewsNext

खोडद : सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. पावसाचे पाणी बिळात गेल्याने साप बिळातून बाहेर येऊन नवीन जागा शोधण्याच्या प्रयत्नांत ते रस्त्यावर येऊन वाहनांखाली सापडून मरत आहेत. दर वर्षी पावसाळ्यात अनेक साप वाहनांखाली सापडून मृत्युमुखी पडत आहेत. रस्त्यावर येणाऱ्या सापांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमींकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत आपण रस्त्यावर गाडीखाली सापडून मृत्युमुखी पडलेले मेलेले अनेक साप नेहमीच पाहत आहोत, पण सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने साप बिळातून बाहेर पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. बाहेर पडलेल्या अनेक सापांचा रस्ता ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली सापडून चिरडून मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

भारतात सापांच्या सुमारे २७८ प्रकारच्या जाती आहेत, यापैकी ५५ जातींचे साप हे विषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या ५५ जाती असून त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, हिरवा घोणस, समुद्र सर्प ( चापडा) हे सहा प्रजातींचे सर्प विषारी साप म्हणून ओळखले जातात.

साप हा प्राणी थंड रक्ताचा प्राणी आहे म्हणजे त्याला त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी काही काळ उन्हामध्ये घालवावा लागतो आणि पुन्हा काही काळ सावलीमध्ये राहून शरीराचे तापमान संतुलित होत असते. यामुळे बऱ्याच वेळा साप उष्णतेच्या शोधात रस्त्यांवर खडकांवर किंवा मोकळ्या जागेत पडून राहतात किंवा उन्हासाठी हालचाल करतात. अशा वेळी ते रस्त्यावर येतात आणि यामध्ये वाहनांखाली सापडून अपघात होतात. रस्त्यावर येणाऱ्या सापांचा जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन वन खात्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी केले आहे.

जुन्नर तालुक्यात प्रामुख्याने रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला धामण, नाग, घोणस, कवड्या, गवत्या, हरणटोळ, पाणदिवड, तस्कर, मांडूळ हे साप सर्रासपणे पाहायला मिळतात. जुन्नर तालुक्यात १४ प्रकारच्या जातींचे साप आढळतात. यात नाग,घोणस,मण्यार,फुरसे हे विषारी साप देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

================================

"साप हे निसर्गातील जैविक नियंत्रक असून निसर्गातील पर्यावरण, तसेच निसर्गातील समतोल राखण्याचे सर्वोत्कृष्ट काम साप करत असतात. सापांचे जतन,संवर्धन व संरक्षण करणे ही काळाची गरज तर आहेच, पण प्रत्येक नागरिकाचे देखील कर्तव्य आहे.रस्त्यावरून जाताना रस्त्यावर साप दिसल्यास घाबरून न जाता वाहनांचा वेग कमी करावा व सापांचा जीव वाचवावा."

यश मस्करे,

निसर्ग व पर्यावरण अभ्यासक, जुन्नर

"रस्त्यावरून प्रवास करताना आपल्या वाहनाचा वेग हा मर्यादित असावा. रस्त्यावर अचानक साप किंवा अन्य वन्यजीव आडवा आला तर त्याला वाचविण्यासाठी आपण आपले वाहन नियंत्रित करू शकू.आपल्या वाहनाचा वेग जास्त असेल तर आपण रस्त्यावर आलेल्या कोणाचाही जीव वाचवू शकत नाही, तसेच त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नांत वाहन नियंत्रित न होऊन आपलाही अपघात होऊ शकतो.म्हणून पावसाळ्यात प्रवास करताना आपल्या वाहनांचा वेग मर्यादितच ठेवायला हवा.यामुळे अनेक साप व अन्य वन्यजीवांचा जीव वाचेल."

योगेश घोडके

वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर, ता.जुन्नर

टीप - सापांचे आणखी दोन फोटो ईमेल वर देखील पाठवले आहेत.

Web Title: Snakes are found dead under vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.