Chandrayaan-3| ...म्हणून चंद्रयान ३ च्या अगोदर रशियाचे यान उतरणार चंद्रावर
By श्रीकिशन काळे | Published: August 17, 2023 06:06 PM2023-08-17T18:06:21+5:302023-08-17T18:12:27+5:30
त्यांचे यान चंद्रयानापेक्षा उशीरा निघाले असले, तरी लवकर पोचणार आहे....
पुणे : भारताचे चंद्रयान ३ हे चंद्रावर १८ ऑगस्ट रोजी पोचणार आहे. परंतु, आपल्यानंतर रशियाने त्यांचे लुना २५ हे यान चंद्राकडे पाठविले. ते आपल्या यानाच्या अगोदर तिथे उतरणार आहे. भारताने गुरूत्वकार्षणाचा फायदा घेऊन यानाला चंद्राकडे पाठविले तर रशियाने त्यांच्या यानाला खास शक्तीशाली रॉकेट जोडले, त्यामुळे त्यांचे यान चंद्रयानापेक्षा उशीरा निघाले असले, तरी लवकर पोचणार आहे. भारतापेक्षा रशियाचे यान ४० ते ७० तासांपूर्वी चंद्रावर उतरेल.
सध्या जगभरात चंद्रयान ३ आणि रशियाच्या लुना २५ या दोन यानांची चर्चा सुरू आहे. दोन्हीपैकी अगोदर कोणते यान पोचेल आणि ते काय याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आहे. खरंतर भारताने आपल्या वेळेनूसार यान चंद्राकडे पाठविले आहे आणि रशियाला मात्र दोन वर्षांचा उशीर झाला. त्यांचे यान २०२१ मध्येच चंद्राकडे जाणार होते. युक्रेन युध्दामुळे त्यांना ते तेव्हा पाठवता आले नाही.
चंद्रयान ३ हे चंद्रावरील दक्षिण धुव्रावर पोचणार आहे. तिथे उतरून तेथील पृष्टभाग, पाणी, खनिजे आदींचा अभ्यास करणार आहे. तिथे केवळ १४ दिवसच अभ्यास करेल. कारण नंतर पूर्णत: अंधार होणार आहे. चंद्रावरील दक्षिण धुव्रावर यान उतरविणारा भारत पहिला देश ठरणार होता, पण रशियाने अगोदरच घाई केल्याने तो पहिला ठरण्याची शक्यता आहे.चंद्रावर ज्या ठिकाणी भारत आणि रशियाचे यान उतरणार आहे. ते दोन्ही जवळजवळ असतील. त्यांच्यातील अंतर ११८ किलोमीटर असणार आहे.
दोन्ही यानांमध्ये काय फरक?
चंद्रयान ३ च्या वरच्या बाजूच्या कवचाला हिटशिल्ड म्हणतात. पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर हे हिटशिल्ड गळून पडते. क्रायोजेनिक इंजिन हे चंद्राकडे जाण्यासाठी मदत करते. लिक्विड इंजिन हे यानाला पृथ्वीच्या कक्षेबाहेर नेते. बुस्टर रॉकेट हे पृथ्वीपासून चंद्राकडे नेण्यासाठी मदत करते. आपले यान गुरूत्वाकर्षाच्या मदतीने कमी खर्चात प्रवास करत आहे. दुसरीकडे रशियाने त्यांच्या यानासाठी सुयोज २.१ व्ही हे शक्तीशाली बूस्टर वापरले आहे. ते पृथ्वीची एकच प्रदक्षिणा घालून चंद्राकडे झेपावले.
आतापर्यंत चंद्रावर चीन, रशिया आणि अमेरिका यांनी यान पाठवले आहेत. भारत हा चौथा देश ठरणार आहे. दक्षिण धुव्रावर चंद्रयान ३ सुमारे १४ दिवस काम करेल. आपण गुरूत्वाकर्षणाचा वापर करून यान पाठवले आहे. म्हणून खर्चही कमी आहे.
- व्ही. व्ही. रामदासी, खगोल अभ्यासक
दोन्ही देशातील यानावर दृष्टीक्षेप
भारत - चंद्रयान ३ | रशिया- लुना २५ |
---|---|
प्रक्षेपण- १४ जुलै | १० ऑगस्ट |
४० दिवसांची मोहिम | ७ दिवसांची मोहिम |
१४ दिवस प्रयोग करणार | वर्षभर प्रयोग करणार |
ऑर्बिटर माहिती देणार, चंद्राचा पृष्टभाग, खनिजांचा अभ्यास पाणी, द्रव पदार्थांचे प्रयोग करणार | यान थेट माहिती पाठविणार |
खर्च- ६१५ कोटी | ३०७५ कोटी खर्च |