"...तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार" धीरेंद्र शास्त्रींनी घेतले तुकोबांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 01:02 PM2023-11-22T13:02:19+5:302023-11-22T13:03:25+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरला होता. ते पुण्यात असल्यामुळे त्यांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले....
पुणे : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. देशभरातील अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा यांच्या दिव्य दरबाराचे आयोजन केले जात असते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात सहभागी होण्यासाठी हजारो-लाखो भाविक येत असतात. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा यांचे दरबार भरले होते. गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरला होता. ते पुण्यात असल्यामुळे त्यांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.
त्यावेळी बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, देहूत येऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेणे हे माझे मोठे भाग्य आहे. येथील ट्रस्टींनी खूप चांगले स्वागत केले. त्यांनी सर्व माहिती दिली. भारत देशात संत परंपरा मोठी आहे. हीच परंपरा आपण पुढे नेली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न असलेले हिंदू राष्ट्र लवकरच निर्माण होईल. मी जे बोललो त्याबद्दल मनापासून माफी मागतली आहे. मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता.
संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आलेल्या बागेश्वर धामचे वीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. पुण्यात कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांना संत तुकाराम महाराजांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोध होत होता. त्यानंतर पुण्यात दाखल होतास पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संत तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दोनदा माफी मागितली. त्यानंतर आज देहूमध्ये जात त्यांनी तुकाराम महाराजांचे दर्शन घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.