...तर मुख्यमंत्री महोदय, आमचं काही चुकलं का? पुणे पालिकेच्या सभागृह नेत्याने मांडली पत्राद्वारे कैफियत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:42 PM2021-05-05T14:42:59+5:302021-05-05T14:45:33+5:30
शहरात आरोग्यव्यवस्था उभी करताना आम्ही कधीही हात पसरले नाहीत.उलट ३५० कोटींहून अधिक निधी कोरोनाविरोधातील लढाईत खर्च केला आहे.
पुणे: पुण्यासह इतर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी पुणे पार पाडत असेल तर पुण्याला आवश्यक असलेली मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची नाही का? शहराला रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा करताना पुण्यावरील वाढीव जबाबदारीचा विचार व्हायला नको का?इतर शहरांना आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होतो, तसा तो पुण्यालाही व्हावा, असे आम्हाला वाटले, तर आमचे काही चुकते आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्राद्वारे विचारले आहे.
कोरोनाच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या लढाईत राज्य सरकारकडून आवश्यक असलेल्या मदतीचा कोणताही हात पुढे आलेला नाही. रेमडेसिव्हर इंजेक्शन कोटा, पुरेसा ऑक्सिजन यासह लसीकरणासाठी लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून मिळत नसल्याची कैफियत पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मांडली आहे.
बिडकर पत्रात म्हणतात, पुणेकर मागील वर्षीच्या १४ मार्चपासून कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. मुंबईपेक्षा अधिक गंभीर स्थिती पुण्यात आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत पुणे पालिकेने तक्रारीचा कोणताही सुर न लावता आपले कर्तव्य पार पाडण्याचीच भूमिका घेतली आहे. शहरातील आरोग्यसेवा भक्कम केली. परिणामी देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक बेड्स आणि व्हेंटिलेटर बेइस विकसित करण्यात पुणे अव्वल शहर ठरले आहे.
मुंबई, दिल्ली, बेंगळुरू चार मेट्रो सिटींच्या तुलनेत दर दहा हजार नागरिकांच्या मागे सर्वाधिक 'सीसीसी' बेड्स, ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स पुण्यात विकसित झाले, हे आम्ही अभिमानाने सांगतो. हे सर्व करताना राज्य सरकारचा मदतीचा भक्कम हात कधीही पुढे आला नाही.
शहरात आरोग्यव्यवस्था उभी करताना आम्ही कधीही हात पसरले नाहीत. कोठून तरी निधी मिळेल, याची आशाळभूतपणे वाट न पाहता, ३५० कोटींहून अधिक निधी करोनाविरोधातील लढाईत पुणे महापालिकेने खर्च केला आहे. शहरातील उद्योजक, स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबर मोट बांधून आम्ही कोरोना संकटाशी झुंजतो आहे. वैद्यकीय सुविधांमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून पुण्यात उपचारासाठी धाव घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे असेही ते म्हणाले.
........
गंभीर कोरोनास्थिती लक्षात घेता, शहराला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता तातडीने करून देण्याबरोबरच लसीकरणासाठी पुण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका.