...म्हणून तयार किल्ले विकत घेण्यावर नागरिक देतायेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 06:04 PM2018-10-31T18:04:33+5:302018-10-31T18:06:42+5:30
दिवाळी निमित्त विविध अाकारांचे तसेच रंगांचे किल्ले बाजारात दाखल झाले अाहेत. नागरिकांची या किल्ल्यांना माेठी मागणी अाहे.
पुणे : दिवाळी म्हंटलं की सर्वत्र किल्ला बनविण्यासाठीची लहानग्यांची धडपड सुरु हाेत असे. अापला किल्ला सुबक कसा करता येईल याकडे प्रत्येकजण बाराकाईने लक्ष देत असे. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्या की किल्ला तयार करण्याची लगबग सुरु हाेत असे. सध्याच्या सिमेंटच्या जंगलामध्ये मात्र हे दिवाळीतील दृश्य इतिहासजमा हाेत चालले अाहे. फारश्या माेकळ्या जागा राहिल्या नसल्याने तसेच फ्लॅट सिस्टीमचे पेव फुटल्याने किल्ला बनविण्यासाठी जागाच उरल्या नाहीत. त्यामुळे अाता एक परंपरा म्हणून बाजारातून पीअाेपीचा किल्ला विकत घेण्यावर नागरिक भर देत अाहेत. या किल्ल्यांना सध्या सर्वत्र मागणी वाढलीये.
पुण्यातल्या कुंभारवाडा परीसरात विविध रंगांचे तसेच अाकाराचे किल्ले दाखल झाले अाहेत. त्याचबराेबर शिवाजी महाराजांची मुर्ती, मावळे, गवळणी, सैनिक असे अनेक चित्रं सुद्धा विक्रीस ठेवण्यात अाली अाहेत. पूर्वी मातीचे किल्ले घराेघरी तयार केले जात असे. दिवाळीच्या सुट्ट्यांमधे मुलांसाठी ही उत्साहाची अाणि अावडीची गाेष्ट असत. सध्याच्या स्मार्ट फाेनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी हाेत चालला असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे बाजारात पीअाेपीचे तयार किल्ले दाखल झाले अाहेत. यात 250 रुपयांपासून ते पाच हजार रुपये किंमतीचे किल्ले अाहेत. केशवनगर येथे हे किल्ले तयार केले जात असून पुण्यातील विविध भागात विक्रीसाठी पाठवले जातात. साचाच्या सहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या या किल्ल्यांना संपूर्ण तयार हाेण्यासाठी साधारण अाठवडा भराचा कालावधी लागताे. या किल्ल्यांबराेबरच केवळ किल्ल्याचा दरवाजा तसेच किल्ल्याचे बुरुजसुद्धा विक्रीस ठेवण्यात अाले अाहेत.
या किल्ल्यांची विक्री करणारे सागर शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून तयार किल्ल्यांना मागणी वाढली अाहे. नागरिकांना वेळ नसल्याने तसेच फ्लॅट सिस्टीममुळे दारासमाेर फारशी जागा नसल्याने तयार किल्ले घेण्यावर नागरिकांचा भर अाहे. विविध अाकारांचे किल्ले विक्रीस उपलब्ध अाहेत. दिवळीच्या काही दिवसांपूर्वी हे किल्ले तयार केले जातात. या किल्ल्यांबराेबरच शिवाजी महाराजांच्या विविध मुर्ती सुद्धा तयार करण्यात अाल्या अाहेत.