...तर सुभाषचंद्र बोसदेखील स्वातंत्र्यसैनिक नाहीत - पी. साईनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:45 AM2023-05-23T09:45:09+5:302023-05-23T09:45:39+5:30
स्वातंत्र्यसैनिकाऐवजी एक चेहरा व्हॅक्सिनपासून ते बस तिकिटापर्यंत...
पुणे : ‘ज्या स्वातंत्र्यसेनानींनी भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. परंतु, ते तुरुंगात गेले नाहीत, म्हणून ते स्वातंत्र्यसैनिक ठरत नाही आणि त्यांना तो दर्जाही दिला जात नाही. हे खरंतर प्रचंड अन्यायकारक आहे. तसा नियम लावायचा झाला तर मग स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस हेदेखील भूमिगत राहून आणि स्वयंसेवक म्हणून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. तेदेखील या नियमानुसार स्वातंत्र्यसैनिक ठरणार नाहीत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक पी. साईनाथ यांनी सोमवारी पुण्यात केले.
मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि पी. साईनाथ लिखित ‘अखेरचे शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी साईनाथ बोलत होते. या पुस्तकाचा मराठी अनुवादन मेघा काळे यांनी केला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, इतिहासकार डॉ. श्रद्धा कुंभोजकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन रामभाऊ लाड, गणपत यादव आणि हौसाबाई पाटील या तिन्ही स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांची रेल्वे लुटली, त्यामध्ये सहभागी झालेल्यांची कथा या पुस्तकात आहे. ज्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळाला नाही आणि कुठेही त्यांची ओळख नोंदवली गेली नाही. त्यांना समोर आणण्याचे काम या पुस्तकातून करण्यात आले. सबनीस आणि कुंभोजकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या पुस्तकासाठी पत्रकार संपत मोरे, नमिता वाईकर यांनीदेखील काम केले.
साईनाथ म्हणाले,‘‘देशातील अनेक जणांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होत, ना की पेन्शन मिळविण्यासाठी. त्यांच्याकडून सरकार स्वातंत्र्यलढ्याचे प्रमाणपत्र कसे मागू शकते? जे देशासाठी लढले त्यांना पेन्शन नको होती, तर त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर, सन्मान हवा होता. तो त्यांना आपण देऊ शकलो नाही. सरकार देऊ शकले नाही. ही शोकांतिका आहे.’’
स्वातंत्र्यसैनिकाऐवजी एक चेहरा व्हॅक्सिनपासून ते बस तिकिटापर्यंत : पी. साईनाथ
साईनाथ म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. त्यासाठी सरकारने ‘आजादी का महोत्सव’ संकेतस्थळ बनवले. त्यासाठी ११० कोटी खर्च केले; पण त्यामध्ये एकाही स्वातंत्र्यसैनिकाचे नाव नाही, कहाणी नाही, कोट नाही. देशाकडील लिस्टमध्ये स्वातंत्र्यसैनिक जिवंत आहेत पण त्यांचा एकही फोटो त्या संकेतस्थळावर नाही. हा कसला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे? पण आज एक फोटो मात्र सर्वत्र पहायला मिळतो. तो फोटो व्हॅक्सिनवर छापला जातो, भविष्यात बस तिकिटावरही त्यांचा फोटो येईल. परंतु, स्वातंत्र्यसैनिकांचा फोटो मात्र कुठेही नाही.’’
स्वातंत्र्यसैनिकांसाठी नियमच वेगळे
स्वातंत्र्यलढ्यात कुरिअरचे काम करणारा माणूसदेखील स्वातंत्र्यसेनानी होता. ज्या महिलेने हाताने भाकरी करून स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांना जेवण दिले. त्या महिलादेखील स्वातंत्र्यसेनानी आहेत; पण आपल्याकडे स्वातंत्र्यसैनिकाचे नियमच वेगळे आहेत, अशी खंत साईनाथ यांनी व्यक्त केली.
विश्वगुरूंना कोण प्रश्न करणार ?
आपल्या देशात कोविड काळात किती मृत्यू झाले, त्याविषयीदेखील चुकीची माहिती दिली गेली. देशात १० मिलियन मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. जागतिक आरोग्य संघटनेने ४० लाख, लॅन्सेट संस्थेने ४५ लाख मृत्यू झाल्याचे सांगितले. पण आपल्या विश्वगुरूने मात्र ४ लाख ८६ हजार मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही, अशी टीका साईनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.