डीएसकेविरोधात आतापर्यंत 1303 तक्रारी, अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 10:03 PM2017-11-06T22:03:31+5:302017-11-06T22:03:51+5:30
पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आतापर्यंत पुणे शहरात १३०३ तक्रारी दाखल झाल्या असून, मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
पुणे : डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आतापर्यंत पुणे शहरात १३०३ तक्रारी दाखल झाल्या असून, मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दररोज येणा-या तक्रारीत वाढ होत असून सोमवारी ३५७ तक्रारदारांनी आपले अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केले. या गुंतवणूकदारांची २५ कोटी ४४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रार अर्जातील रक्कम पाऊणशे कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
पुण्याबरोबरच मुंबई आणि कोल्हापूर येथेही डीएसके यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून, तेथेही तक्रारदारांची संख्या वाढत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर डी. एस. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकार पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावी, अशी विनंती केल्याने न्यायालयाने ही सुनावणी मंगळवारी ठेवली आहे. सरकार पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देईल.