अकरावीत आतापर्यंत ४३ हजार १८७ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:44+5:302021-09-17T04:15:44+5:30
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ ३ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशास ...
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ ३ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचे आव्हान केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीसमोर असणार आहे. तसेच येत्या १६ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची विशेष फेरी राबविली जाणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या प्रवेश फेरीतून २४ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी, दुसऱ्या फेरीतून ७,५८७ विद्यार्थ्यांनी, तर तिसऱ्या फेरीतून केवळ ३ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशाची विशेष फेरी १६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. तसेच पसंतीक्रम नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या फेरीतून प्रवेश दिला जाणार आहे. विशेष फेरीची प्रवेशाची यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
--------------------------------------------
तीन फेऱ्यांमधून झालेले प्रवेश
फेऱ्या प्रवेशास पात्र विद्यार्थी दिलेले प्रवेश झालेले प्रवेश
पहिली फेरी ५६,७६७ ३८,८३१ २४,४६८
दुसरी फेरी ३५,६९४ १५,९६७ ७,५८७
तिसरी फेरी २९,५०५ ९,२६१ ३,५३५
-----------------------------------