जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७४ ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:53+5:302021-06-17T04:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाच्या ‘भारत नेट’ अंतर्गत ग्रामीण भागात गावा-गावांत बीबीएनल व सीएससीच्या वतीने फायबर ऑपटिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाच्या ‘भारत नेट’ अंतर्गत ग्रामीण भागात गावा-गावांत बीबीएनल व सीएससीच्या वतीने फायबर ऑपटिक इंटरनेट लाईन टाकण्यात आली आहे. याच्या पुढच्या टप्प्यात ग्रामपंचायतींना मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे ५८१ ग्रामपंचायतींना ही मोफत वायफाय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ ७४ ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण ८६२ ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पोहोचली आहे. आता पुढील टप्प्यात ग्रामपंचायतींना मोफत वायफाय देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५८१ ग्रामपंचायतींना मोफत वायफाय देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासह टपाल कार्यालय, रेशन दुकान, जिल्हा परिषद शाळा, बँक, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, तलाठी कार्यालयांना मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे.
याशिवाय सर्वच शासकीय कार्यालय, वैयक्तिक घरी आणि दुकानदार, व्यापाऱ्यांना वायफाय ब्रॉड बॅन्ड कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात येईल. ग्रामीण भागातील उद्योग-व्यवसाय, सेतू सुविधा, शेतमाल खरेदी-विक्री, बँक सेवा, टेलिमेडिसिन, ई-कोर्ट, मोबाईल बँकिंग, नोकरी मार्गदर्शन केंद्र, महिला बचत गट केंद्र, गॅस बुकिंग केंद्र, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन सेवा केंद्रांना इंटरनेटचा फायदा होणार आहे. परंतु सध्या मोफत वायफाय देण्याचे काम खूपच कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील ५८१ ग्रामपंचायती पैकी आतापर्यंत केवळ ७४ ग्रामपंचायतींना मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली आहे.
------
जिल्ह्यात आंबेगाव, दौंड आणि बारामतीत मोफत वायफाय
जिल्ह्यात तेरा तालुक्यांतील ५८१ गावांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरविण्यात येणार आहे. पण आतापर्यंत केवळ ७४ ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यात आली असून, आंबेगाव तालुक्यातील ४१, बारामती तालुक्यातील १४ आणि दौंड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींना ही सुविधा मिळाली आहे.
-----