...म्हणून ते सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात: गृहमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 03:16 PM2021-01-01T15:16:35+5:302021-01-01T15:31:26+5:30
आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणारच आहेत.
पुणे : देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. अर्थातच ते जे काही महाविकास आघाडीसरकारविषयी बोलणार ते विरोधातच असणार आहे. याचमुळे फडणवीस यांच्या टीकेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
पुण्यातील येरवडा कारागृहाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपणाची जबाबदारी असल्याने ते आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते टीकाच करणार आहेत. परंतू, फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण टीका करण्यापाठीमागे त्यांचे दुकान बंद होऊ नये हेच कारण आहे. म्हणून ते आमच्यावर टीका करत असतात.
येरवडा कारागृह भेटीदरम्यान देशमुख यांना कारागृह प्रशासनाकडून विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
.........
भिडे, एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई होईल...
कोरेगाव दंगलीच्या संदर्भात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्याबाबत योग्य तो तपास करून रीतसर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांच्याविरुद्ध चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे. त्याचप्रमाणे माजी न्यायमूर्ती व एल्गार परिषदेचे आयोजक असलेल्या बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याविषयीची माहिती घेत असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे.