...म्हणून तो निघाला आई-वडिलांंना सोडायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:29 AM2020-12-04T04:29:13+5:302020-12-04T04:29:13+5:30
पुणे: आई-वडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि त्याच्यासह बहुसंख्य रिक्षाचालक समाजाच्या शिव्याशापांचे धनी ...
पुणे: आई-वडिलांना आळंदीला सोडायला निघालेल्या रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि त्याच्यासह बहुसंख्य रिक्षाचालक समाजाच्या शिव्याशापांचे धनी झाले. त्याच रिक्षाचालकाने तो कोणत्या रिक्षा संघटनेचा सदस्य आहे हेही स्पष्ट केले होते. त्यामुळे त्या रिक्षा संघटनेने याचा तपास घेतला आणि त्या रिक्षाचालकाच्या व्यथेमागची एक कथा उलगडली गेली.
बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर आणि उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांनी नावावरून या रिक्षाचालकाचा शोध घेतला. एका खासगी वित्तीय कंपनीकडून कर्ज काढून त्याने रिक्षा घेतली होती. कोरोना टाळेबंदीत त्याचा रिक्षाचा व्यवसाय पूर्ण बंद झाला. घरात खाणारी आठ माणसे. कमावणारा तो एकटाच. लॉकडाऊनमध्ये कर्जाचे हप्ते थकले म्हणून त्याची रिक्षा ओढून नेली. त्यामुळे कुटुंबाला उपवास घडू लागले. हे हाल त्याच्या आईवडिलांना पाहवत नव्हते.
मुलावरचा आपला भार कमी व्हावा यासाठी त्यांनी स्वत: होऊन भिक्षा मागणे सुरू केले. ते मुलाला पाहवत नव्हते. त्याने आईवडिलांना घराच्या परिसरात फिरत नका जाऊन म्हणून सांगितले, मात्र वयामुळे त्यांना ते समजत नव्हते. अखेरीस किमान काही दिवसांपुरते त्यांना आळंदीला सोडून येऊ असा विचार त्याने केला आणि त्याप्रमाणे तो तिथे गेला. नागरिकांच्या गराड्यात सापडला. खोटे काहीही न बोलता त्याने सगळे खरे सांगितले आणि समाजमाध्यमात तो टीकेचा धनी झाला. संघटनेच्या सदस्यांनी ही सर्व माहिती मिळाल्यावर त्वरेने हालचाल केली. त्याला आर्थिक मदत मिळवून दिली. वित्तीय कंपनीबरोबर संपर्क साधून रिक्षा परत आणली.
कोरोना टाळेबंदी काळात अनेकांवर अशी उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कर्जदार व्याजाच्या हप्त्यांसाठी त्यांच्यावर जबरदस्ती करत आहेत. सरकारने किमान या कंपन्यांच्या बेमुर्वतपणाला आळा घालावा, अन्यथा अशा घटना वाढतील, अशी भीती संघटनेने या सर्व प्रकारानंतर व्यक्त केली.
फोटो - वित्तीय कंपनीने रिक्षा ओढून नेल्याने आई-वडिलांंना सोडून देण्याची वेळ आलेल्या रिक्षा चालकाला ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने त्याची रिक्षा बुधवारी परत मिळवून दिली.