... म्हणून मी भाजपात गेलो; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:23 PM2023-03-27T13:23:23+5:302023-03-27T13:24:33+5:30
उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याचं आरोप केला.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवला. त्यानंतर, आता उद्धव ठाकरेंवर शिंदे गट आणि भाजपाकडून पलटवार करण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून उद्धव ठाकरेंनी टीका करण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं मला पाहायला मिळालेलं नाही, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केलाय. तर, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं, चॅलेंजच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाही उल्लेख केला होता. आता, त्यावरुन, हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याचं आरोप केला. त्यांच्याकडे इतर पक्षातील आमदार-खासदार गेले की ते गुजरातच्या निरमा पावडरने धुवून काढतात. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं, आता चांगली झोप लागतीय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन पाटील यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख मालेगावच्या सभेत केला. आता, उद्धव ठाकरेंच्या या टिकेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पलटवार केलाय. वैफल्यग्रस्त झाल्याने उद्धव ठाकरे अशी टीका करत असल्याचं ते म्हणाले.
मी जे विधान केलं होतं, त्यामागची पार्श्वभूमी उद्धव ठाकरेंनी अगोदर समजून घ्यावी. कारण, मी तेव्हा केलेलं विधान हे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं. गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात माझ्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही किंवा कुठलाही आरोप नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपावर माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, वैफल्यग्रस्त भावनेतून हे बिनबुडाचे आरोप होत असल्याचेही पाटील यांनी म्हटले.
म्हणून मी भाजपात गेलो
माझ्यावर प्रचंड मोठा अन्याय काँग्रेस-राष्ट्रवादीकडून झाला, आम्ही पक्षासाठी एवढं मोठं काम केलं, पण आमचा स्वाभीमान दुखावला गेला. आम्ही प्रामाणिकपणे काम करुनसुद्धा आमच्यावर एकवेळा नाही, ४ वेळा अन्याय झाला. त्यामुळे, आपल्याला दिलेला शब्द कोणी पाळत नसेल तर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आम्ही हा निर्णय घेतला. भाजप हा राष्ट्रीय स्तरावरील चांगला पक्ष आहे, देवेंद्रजींसोबत आमची चर्चा झाली. त्यानंतर, आमचा सर्वांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी, या भागातील कामं होण्यासाठी आम्ही भाजपमध्ये गेलो, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.