...म्हणून मी भारत - इंग्लंड कसोटी पाहायला गेलो; शरद पवारांनी सांगितली जुनी आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 03:37 PM2022-04-25T15:37:11+5:302022-04-25T15:37:45+5:30
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली
पुणे : पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली. माझी कित्येक वेळा सत्ता गेली, अशी मिश्कील टिप्पणी करून पवारांनी 1980 मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाले. आमचं पुलोद सरकार बरखास्त केलं ही बातमी मला रात्री 12 वाजता कळली. लगेचच रात्री तीन ते चार मित्रांना बोलावलं आणि सामानाची आवराआवर केली. सकाळी दुसरीकडे राहायला गेलो. वानखेडे स्टेडियमवर भारत-इंग्लंडचा कसोटी सामना होता. ती दिवसभर पाहायला गेलो असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्ता येते आणि जाते. त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही. पण काही लोक फार अस्वस्थ आहेत. त्यांना दोष देता येत नाही. कारण निवडणुकांपूर्वीच ‘मी येणार येणार’ अशी घोषणा त्यांनी केल्या. मात्र ते घडू शकले नाही, त्यातून ही अस्वस्थता असते, असा टोला पवारांनी देवेंद्र फडणसवींना यावेळी लगावला.
सध्याच्या राज्यातील राजकारणात या गोष्टी पाहायला मिळत नाहीत
''महाराष्ट्रात यापूर्वी कधीच असे नव्हते. राज्यात अनेक वर्षे काम केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीरपणे इतके मतभेद असायचे, की एकमेकांना शब्द वापरण्याबाबत आम्ही कधीच काटकसर केली नाही. परंतु, संध्याकाळी ते माझ्या किंवा मी त्यांच्या घरी जात असू. औरंगाबादमध्ये आमच्या सभा झाल्या तेव्हा विरोधकांवर तुटून पडलो. सभा संपल्यानंतर तिथले ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते किंवा अनंत भालेराव या सर्व व्यक्तींबरोबर आमची संध्याकाळ जायची आणि सभेत काय बोललो याचे स्मरणही व्हायचे नाही. ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून होती. महाराष्ट्राच्या विधीमंडळात नसलो तरी पाहिले आहे की मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस.एम जोशी हे विरोधी पक्षातले नेत्यांमधील चर्चा टोकाची असायची पण नंतर तिघेही एकत्र बसून राज्याच्या विकासावर चर्चा करायचे. दुर्देवाने, सध्याच्या राज्यातील राजकारणात या गोष्टी पाहायला मिळत नाहीत अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.''