..म्हणून परमबीर सिंग यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा: माजी आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:01 PM2021-03-22T17:01:26+5:302021-03-22T17:03:06+5:30
आताच्या घडीला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला तर चुकीचा संदेश जनतेत जाईल...
पुणे : परमबीर सिंग यांनी कोणतेही पुरावे न देता पत्रात १०९ कोटींचा उल्लेख केला आहे. या प्रकाराची कल्पना होती तर त्यांनी त्यावेळेस कारवाई का केली नाही ? असा सवाल विचारत खंडणीखोरीला पाठीशी घालणाराच सहआरोपी असतो. त्यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा, अशी भूमिका माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंनी घेतली आहे. दरम्यान गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यास वाईट संदेश जाईल असंही ते म्हणाले.
एखाद्या राजकीय पुढाऱ्याने लिहावे असे पत्र परमबीर सिंग यांनी लिहिले आहे. सहआरोपी म्हणून त्यांच्यावर खटला भरावा इतक्या चुकीचे पद्धतीने लिहिलेले पत्र आहे. तो सिंह यांच्या विरोधातील पुरावा होऊ शकतो. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यापेक्षा परमबीर सिंग यांची सखोल चौकशी व्हावी. असे ते म्हणाले.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतशी संवाद साधताना ते बोलत होते.
खोपडे पुढे म्हणाले, “पत्रात अस लिहिलंय की, स्वतःच्या हद्दीत असणाऱ्या पोलीस सहकाऱ्याला पैसे गोळा करण्याचे आदेश दिले जातात. रेस्टॉरंट पैसे गोळा करणे हा गुन्हा आहे. असे चुकीच्या पद्धतीने लिहिण्याची अपेक्षा आयपीएस अधिकाऱ्याकडून नाही. “
शंभर कोटींच्या मुद्द्याबाबत विचारले असता ते ,” महाराष्ट्रात कोणीही अधिकारी, ऑफिसर धुतल्या तांदळासारखा नाही. सिंग यांच्या पत्रात १०० कोटींचा उल्लेख केलाय त्यावर विश्वास ठेवू नये. वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचे कृत्य आणि बेजबाबदार सिंह यांचे पत्र म्हणजे महाराष्ट्र पोलीस नव्हे. महाराष्ट्रात २० हजारपेक्षा जास्त पोलीस निरीक्षक, ३५० पेक्षा जास्त आयपीएस तर ७ लाख पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. त्या दोघांचे कार्य आणि बाकी सर्व पोलिसांचे कार्य अशा दोन बाजू बघितल्या. तर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असे अजिबात म्हणता येणार नाही. अशा प्रकारची सकारात्मक बाजू पोलिसांच्या वतीने त्यांनी मांडली. राजकीय नेत्यांवर निशाणा साधताना खोपडेंनी परमबीर यांनी हे पत्र राजकीय हेतूनेच लिहिले असावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
खोपडे म्हणाले, महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी स्वार्थी असतात. असे स्पष्ट करणारी सिंह यांची भूमिका वाटते. त्यांच्या वागण्यातून महाराष्ट्र पोलिसांचा कमकुवतपणा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाला अशा आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत विचार करावा लागेल.
सिंग यांची वर्तणूक ठीक नसल्याचा आरोप करत खोपडे म्हणाले,”परमबीर सिंग या व्यक्तीने १४३ अधिकाऱ्यांचे करिअर बरबाद केले आहे. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून कारवाई केली. आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारमध्ये फेरफार केले. तर हा लोकशाहीचा पराभव ठरेल. तसेच ही कारवाई करून मंत्र्याचा राजीनामा घेतला तर वाईट संदेश जनतेत पोहोचणार आहे. त्यामुळेच परमबीर सिंग यांच्या अर्जाची खोल चौकशी व्हावी, असेही यावेळी खोपडे यांनी सांगितले.