...त्यामुळे माळेगावच्या सभासदांना योग्य दर देता आला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:48+5:302021-09-10T04:13:48+5:30
माळेगाव: माळेगाव कारखान्याच्या संचालकांचे हातपाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून ठेवल्यानेच सभासदांना योग्य दर देता येऊ ...
माळेगाव: माळेगाव कारखान्याच्या संचालकांचे हातपाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून ठेवल्यानेच सभासदांना योग्य दर देता येऊ शकत नाही, असा उपरोधिक भाषेतील टोला माजी अध्यक्ष व विरोधी संचालक रंजन तावरे यांनी अंतिम दरावरून अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांना लगावला आहे.
माळेगाव कारखान्याच्या वतीने सन २०२०—२१ गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला २७५०, तर गेटकेन धारकांना २६०० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. सोमेश्वर कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडत ३१०० इतका उच्चांकी दर दिला आहे. माळेगावच्या ऊस दरावरून सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. मागील गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसास कारखान्याने एफआरपीचे २४५९ रुपये प्रतिटन यापूर्वीच दिलेले आहेत तसेच कांडेबिल प्रतिटन १०० रुपये अदा केलेले आहेत. म्हणजेच सभासदांना आत्तापर्यंत २५५९ रुपये प्रतिटन दिलेले आहेत .आत्ता अंतिम ऊसदर २७५० जाहीर केल्याने उर्वरित १९१ रुपये प्रतिटन शेतकरी सभासदांना दिवाळीपूर्वी मिळणार आहे.
रंजन तावरे यांनी विद्यमान संचालक मंडळाचा खरपूस समाचार घेतला आहे.आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो.त्यावेळी सभासद राजा होता.आम्ही पाच वर्षांत उच्चांकी दर दिला. मात्र आत्ताच्या संचालक मंडळावर कुणाचा तरी अंकुश आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना विचारून दर द्यावा लागतो.आमच्या कारभारावर टीका करताना आम्ही आधुनिकीकरण केल्यानेच आपले उच्चांकी गाळप झालेले आहे ,हे विसरता कामा नये असा टोला देखील लगावला. संचालक मंडळाच्या कामकाजात अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी लवकरच सभासद शेतकरी यांच्यासमोर आणल्या जातील.
————————————————————
संचालक मंडळाने सर्व साधारण सभा ऑनलाईन घेण्याऐवजी कोरोनाचे नियम पाळून ऑफलाईन घ्यावी. गेल्या दोन वर्षांत केलेल्या चुकीच्या कामाचा पदार्फाश करू.
रंजन तावरे- विरोधी संचालक