...म्हणून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करू नये : रामदास आठवले यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 04:29 PM2021-07-16T16:29:46+5:302021-07-16T16:40:59+5:30
पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही : रामदास आठवले
पुणे : आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र आता केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे.
रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते.
आठवले म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य भाजपमध्ये गेले. आणि पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करू नये. देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्री मंडळात नेत्यांना स्थान गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही.
आठवले पुढे म्हणाले,एल्गार परिषद व भिमा कोरेगाव दंगल याचा काहीही संबंध नाही. एल्गार परिषदेतील भाषणांमुळे नक्षलवाद वाढू नये म्हणून संशयितांवर कारवाई सुरू आहे. जे आंबेडकरवादी आहेत; ते नक्षलवादी विचाराचे असू शकत नाहीत.
यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सादर केलेल्या कवितांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. आठवले म्हणाले, जबतक है केंद्र मे नरेंद्र मोदी, तब तक कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी. 'जरी आली कोरोनाची तिसरी लाट, तर आम्ही लावू त्याची वाट..';
'जे रोज देतात इतरांना टोले, त्यांना म्हणतात नाना पटोले' या कविता सादर केल्या.