... तर पुण्यात मॅचचं तिकीट फ्री, जबाबदारी आमची; रोहित पवारांचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:41 PM2023-10-19T12:41:49+5:302023-10-19T12:43:00+5:30
आमदार रोहित पवार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्थर्व सुदामे यांनी सामन्यापूर्वी एक रिल्स बनवले आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे ५ सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होत आहेत. त्यातील पहिला सामना आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात होत असून येथील सामन्यांच्या तिकीटासाठी मोठी कसरत क्रिकेटचाहत्यांना करावी लागत आहे. टीम इंडियाचे सामने पाहण्यासाठी आयसीसीच्या वेसबसाईटवरुन ऑनलाईन बुकींग सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी येत असल्याची चाहत्यांची तक्रार होती. अनेकांनी एमसीएचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे ही तक्रार केली होती. आता, या सामन्यादरम्यान रोहित पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात, ते तिकीट मोफत देण्याची सोय आम्ही करू असं म्हणत आहेत.
आमदार रोहित पवार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्थर्व सुदामे यांनी सामन्यापूर्वी एक रिल्स बनवले आहे. त्यामध्ये, रोहित पवार अथर्व सुदामे यांना मैदानाची माहिती देताना, आम्ही पार्कींग, पाणी मोफत दिलंय. जेवणाचीही व्यवस्था ठराविक रक्कम देऊन केलीय, असं सांगताना दिसून येतात. त्यावर, मग तिकीटही मोफत देता का, असं अथर्व सुदामे म्हणतात. त्यावर, तुमच्या व्हिडिओला २० लाख व्हूज झाल्यास तुम्हाला मोफत तिकीट द्यायची व्यवस्था आम्ही करू असं रोहित पवार म्हणताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून रोहित पवार आणि अथर्व सुदामे यांच्यातील क्रिकेटपूर्वीचा मजेशीर संवाद पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांत या व्हिडिओला २० लाख ३० हजार व्ह्यूजही मिळाल्याचं दिसून येत आहे.
विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध ५ वा सामना
भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयासह शानदार सुरुवात केली भारतीय संघ आज बांगलादेशच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय करणार नाही. विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमने-सामने आले असून भारताने तीनवेळा तर बांगलादेशने एकदा बाजी मारली आहे.
पुण्यात ५ सामने, पहिला सामना १९ ऑक्टोबरला
पुण्यातील गहुंजे मैदानावरील पाचपैकी चार सामने हे डे-नाईट होणार आहेत. तर, एक सामना दिवसा खेळवला जाणार आहे. १९, ३० ऑक्टोबर, १ आणि ८ नोव्हेंबर रोजी दिवस-रात्र सामने खेळवले जाणार आहेत. तर ११ नोव्हेंबर रोजी एकमेव सामना दिवसा होणार आहे.
पुणे महापालिकेनं केली बसची सोय
गहुंजे स्टेडियमवरील सामने पाहण्यासाठी पुणे मनपा भवन येथूनल सकाळी ११, ११.३५, १२.०५ यावेळेला बस सुटतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ११ आणि साडेअकरा वाजता बस सुटेल. तर, निगडी टिळक चौकातून दुपारी १२ आणि साडेबारा वाजता बस सुटणार आहे
डे-नाईट सामन्यासाठी मनपा भवन येथून सकाळी ८.२५, ८.५०, ९.०५ अशा तीन बस सोडण्यात येतील. तर, कात्रज बायपास येथून सकाळी ८.१५ व ८.३५ या दोन बस असणार आहेत. निगडी टिळक चौकातूनही सकाळी साडेआठ व नऊ वाजता बस सुटणार आहे.