... तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार; सुप्रिया सुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:25 PM2023-01-30T16:25:20+5:302023-01-30T16:37:31+5:30
दिव्यांगांसाठी शासनाच्या योजना आहेत त्यांनाच त्या मिळत नसतील तर योजनांचा उपयोग काय?
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही दिव्यांगाना घरबसल्या प्रमाणपत्र पाठवतो. अशी सुविधा संपूर्ण देशात फक्त आपल्याकडे आहे. ज्याच्यासाठी शासनाच्या योजना आहेत. त्यालाच जर त्या मिळत नसतील तर त्यांचा उपयोग काय? केंद्र सरकारने, दिव्यांगाना लाभापासून वंचित ठेवणे गुन्हा आहे', असा कायदा केला आहे. तर मग हे केंद्र सरकार गुन्हेगार असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गेले अनेक महीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही. याबाबत केंद्र सरकारपर्यंत आवाज पोहचवण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्ही आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
...तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही
केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आता येत्या दोन दिवसात याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात दाद मागू; आणि त्यानंतरही मागणी पूर्ण झाली नाही, तर उपोषण करण्यावाचून गत्यंतर नाही, याची सरकारने नोंद घ्यावी". महात्मा गांधीजींची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जात आपल्याला दिव्यांगाना न्याय द्यायचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.