...म्हणून आदिवासी बांधव वसुबारस ऐवजी 'वाघबारस' साजरा करतात! वाचा सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 03:43 PM2020-11-12T15:43:27+5:302020-11-12T15:44:19+5:30
आदिवासींच्या बांधवांच्या जीवनात 'वाघबारस' या दिवसाचे विशेष महत्व आहे...
अशोक खरात-
पुणे (खोडद) : वसुबारस पासून दिवाळीच्या पहिल्या सणाला आपण सर्वजण धुमधडाक्यात सुरुवात करतो. पण भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा यांनी नटलेला देश म्हणून ओळखला जातो. त्याचमुळे काही किलोमीटर इथे प्रांत बदलतो तसे भाषा, परंपरा बदलत जातात. त्यात आदिवासी समाज तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसाठी प्रचलित आहे. त्यांच्या परंपरांचे आकर्षण देश विदेशातील पर्यटकांना देखील पडते. दिवाळीच्या सणानिमित्ताने त्यांच्या अजून एक आगळीवेगळी परंपरा पाहायला मिळते.
निसर्ग आणि निसर्गातील प्राण्यांनाच आपला देव मानून निसर्गाची व प्राण्यांची पूजा करून निसर्गप्रती असलेली श्रद्धा व निष्ठा आदिवासी बांधव विविध सणांच्या माध्यमातून व्यक्त करतात. दिवाळीसारख्या सणाची सुरुवात सर्वत्र वसुबारस साजरी करून होत असतानाच आदिवासी बांधव याच दिवशी 'वाघबारस' साजरा करून वाघ व निसर्गाप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करताना पाहायला मिळतात.
वर्षभरात केलेले नवस फेडण्यासाठी महत्वाचा मानला जाणारा दिवस व आदिवासी परंपरा व प्रथेप्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस असतो. या दिवशी मोठ्या उत्साहात 'वाघबारस' साजरी केली जाते. मात्र, आता काळाच्या ओघात विविध संस्कृती, परंपरा लोप पावत असताना आदिवासी बांधव वाघबारस साजरा करण्याची परंपरा जपण्याचा मनोमन प्रयत्न करतात.
आदिवासींच्या बांधवांच्या जीवनात 'वाघबारस' या दिवसाचे विशेष महत्व आहे.आदिवासींचे जीवन पावन करणारा 'वाघबारस' हा दिवस मानला जातो. वाघ दिसणे किंवा त्याचा आपल्या परिसरात वावर असणे हे आदिवासी बांधव शुभ लक्षण मानतात. ज्या भागात वाघाचे वास्तव्य आहे त्या भागात अवर्षण परिस्थिती कधीही निर्माण होत नाही.अशा भागात नेहमी सुबत्ता असते अशी आदिवासी बांधवांची भावना आहे.
वाघबारसच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन गावच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन मोठ्या श्रद्धेने पूजा करून नवसपूर्ती केली जाते.जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांचे रक्षण व्हावे या भावनेतून वाघोबाला कोंबडा, बोकडाचा नैवैद्य दाखवला जातो तर काही भागात डांगर,तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो.
वाघबारशीला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. या ठिकाणी गावातील प्रमुख जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात.वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते, त्यात रांगोळी व फुलांच्या माळा लावल्या जातात, देवांना शेंदूर लावला जातो. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाते. सगळे लोक तेथे जमतात गुराखी मुले वाघ, काही जण अस्वल तर काही जण कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. त्यातल्या एखाद्याला वाघ बनवले जाते व या वाघाला पळायला लावून ‘आमच्या शिवारी येशील का’ असे विचारले जाते. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’ म्हणत पुढे पळतो असा हा खेळ खेळला जातो.
वाघबारशीच्या दिवशी आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर कोड्या लावतात.नारळ फोडून पूजा करत देवाच्या पाया पडून आराधना करतात. 'आमचे, गव्हाऱ्यांचे, गोरा – ढोरानचे खाडया, जनावरांपासून रक्षण कर,आम्हांला चांगले पीक दे, आजारांना दूर ठेव’ असे मागणे मागितले जाते.
रात्री व पहाटे एकाच्या हातात दिवा व त्याच्या बाजूने मोराची पिसे व झेंडूच्या फुलांची सजावट केलेली असते.या मंगलमय वातावरणात हे सर्व बांधव तालासुरात 'दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गायी, म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या..! अशी वेगवेगळी गीते म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सण मागतात.सायंकाळी घरच्या गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते.तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो.सर्व प्राण्यांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते व त्यांना गोडधोड नैवद्य भरवला जातो.
=================================
"आदिवासी बांधवांनी वाघाला व निसर्गाला देव मानले आहे.सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काही ठिकाणी वाघोबाच्या स्थापन केलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. काही आदिवासी भागात, अनेक गावांत वाडय़ा-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत... ''
- रवी ठोंबाडे, अध्यक्ष,भंडारदरा टूरिझम