....म्हणून शेतकरी उखडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:13+5:302021-09-03T04:12:13+5:30
बारामती : ऐन श्रावण महिन्यामध्ये भाजीपाला मातीमोल किमतीने विकला जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उत्पादन खर्च ...
बारामती : ऐन श्रावण महिन्यामध्ये भाजीपाला मातीमोल किमतीने विकला जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने, तसेच बाजारात भाजीपाला नेला तर पदरचे पैसे खर्च करावे लागत असल्याने इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके सोडून दिली आहेत.
एकीकडे किरकोळ बाजारात ग्राहकाला भाजीपाला दामदुपटीने व्यापाऱ्यांकडून विकला जात आहे. मात्र, पिकवणाऱ्या शेतकऱ्याला हातची पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी वडापुरी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्याने शहरातील बाबा चौकात ढोबळी मिरची दर न मिळाल्याने वैतागून रस्त्यावर ओतून दिली होती. तर बिजवडी (ता. इंदापूर) येथील रोहित गेंड या शेतकऱ्याने १ एकर क्षेत्रावर सिमला मिरचीची लागवड केली होती. त्यांनी ६३१ किलो सिमला मिरची मुंबईच्या बाजारात पाठविली होती. या मिरचीला ३ रु. किलो दर मिळाला. ६०० किलो सिमला मिरचीचे रोहित गेंड यांना ४ हजार ९६० रुपये मिळाले. त्यामध्ये २ हजार २८० रुपये गाडीभाडे वगळता गेंड यांच्या हातात २ हजार २४६ रुपये शिल्लक राहिले. त्यामधील १ हजार २०० रुपये मजुरी मिरची तोडण्यासाठी गेली. औषधे, खते, वीजबिल यांचा खर्च वगळता आमच्या हातात काय राहिले असा, उद्विग्न सवाल गेंड यांनी केला. त्यामुळेच बाजारात माल पाठवून आणखी नुकसान करून घेण्यापेक्षा मिरचीची झाडे उखडून काढत असल्याचे रोहित गेंड यांनी सांगितले. रोहित गेंड यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनीही टोमॅटो, करडई आणि सिमला मिरचीसारखी पिके सोडून दिली आहेत. निमगाव केतकी, शेळगाव, गोतोंडी भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाल्याने अडचणीत आहेत. टोमॅटोची किंमत १ ते २ प्रति किलो मिळत आहे. त्यावर झालेला खर्चसुद्धा वसूल करणे कठीण झाले. कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या आहेत. व्यवसाय ठप्प झाले आहेत, अशा परिस्थितीत गावातील शेतकरीही अस्वस्थ झाला आहे.
फोटो ओळी : बिजवडी येथील रोहित गेंड या शेतकऱ्याने ढोबळी मिरचीने लगडलेली झाडे फेकून दिली.