...तर दोन महिन्यांत प्रत्येक पुणेकराला लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:41+5:302021-03-17T04:11:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्याकरिता राज्य व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्याकरिता राज्य व केंद्र शासनाने समन्वय साधून लसीकरण केंद्रे वाढवावीत, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
नागरिक लस घेण्यास तयार आहेत. शहरात आठशे खासगी, तर शंभर सरकारी रुग्णालये आहेत. या सर्व नऊशे रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा निर्माण केली तर दिवसाला तीस हजार पुणेकरांना लस देता येईल. असे झाल्यास दोनच महिन्यांत सर्व पुणेकरांना लस मिळू शकेल, असे महापौर मोहोळ म्हणाले.
पुण्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शहरात कोरोना रुग्णांसाठी चार हजार दोनशे खाटा उपलब्ध आहेत. यातील दोन हजार दोनशे खाटा रिकाम्या असून उर्वरित दोन हजार खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्गाचा वेग अधिक असला, तरी त्याची तीव्रता कमी आहे. सौम्य लक्षणे दिसत आहेत. गृह विलगीकरणामध्ये राहून उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. रुग्णसंख्या वाढली तर आवश्यकतेनुसार जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे मोहोळ म्हणाले.
चौकट
दोन्ही डोस एकाच लसीचे
“कोव्हॅक्सीन की कोव्हीशिल्ड यावरून काळजी करण्याचे कारण नाही. दोन्ही लसी प्रमाणित आणि भारतातच उत्पादित झालेल्या आहेत. ज्या लसीचा पहिला डोस घेतला त्याच लसीचा दुसरा डोस देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. नागरिकांनी मनात संदेह न ठेवता लस घ्यावी. दोन्हीमध्ये फरक नाही. आजवर पावणेदोन लाख पुणेकरांचे लसीकरण झाले आहे,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.