तर कुलगुरू कार विकून टाकणार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:50+5:302021-08-20T04:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘तुम्हाला जर बससेवा वेळच्या वेळी मिळाली तर...’ असा प्रश्न विचारताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘तुम्हाला जर बससेवा वेळच्या वेळी मिळाली तर...’ असा प्रश्न विचारताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘..तर मी माझी कार विकून टाकेन आणि बसने प्रवास करायला सुरुवात करेन ’, असे विधान केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील २० विद्यार्थी विविध आर्थिक स्तरातील नागरिकांचे पीएमपीएमएलच्या सुविधांबाबत सर्वेक्षण करत आहेत. याचाच भाग म्हणून मधुरा गुंजाळ या विद्यार्थिनीने कुलगुरूंना प्रश्न केला असता त्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
पुण्यातील तीन हजार, तर पिंपरी-चिंचवड शहरातील दोन हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात सार्वजनिक बसने प्रवास करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच नवीन सुविधांबाबतही नागरिकांची मते जाणून घेतली आहेत. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्त्री अभ्यास केंद्र संचालक डॉ. अनघा तांबे यांच्या पुढाकाराने सर्वेक्षण केले जात आहे.
डॉ. करमळकर म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक सध्या आहे, त्यापेक्षा अधिक सक्षम झाली तर वैयक्तिक वाहने कमी होतील. याचा फायदा पर्यावरणाला नक्कीच होईल. या कामासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे ही अत्यंत कौतुकाची बाब आहे.”