...म्हणून आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर जाहीर भाषणात काय म्हणाले छगन भुजबळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 21:20 IST2025-01-03T21:20:01+5:302025-01-03T21:20:44+5:30
राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे दोन नेते एका मंचावर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावरून राजकीय तर्क-वितर्कही लावले जात होते.

...म्हणून आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर जाहीर भाषणात काय म्हणाले छगन भुजबळ?
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ हे पुण्यातील चाकण इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी एका मंचावर आले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे दोन नेते एका मंचावर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यावरून राजकीय तर्क-वितर्कही लावले जात होते. याबाबत या कार्यक्रमातूनच खुलासा करत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.
"मी आणि शरद पवारसाहेब एकाच मंचावर येणार असल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. पण मी तुम्हाला सांगतो, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांसंदर्भातील कुठलाही कार्यक्रम कुठेही असेल तर पवारसाहेब त्या कार्यक्रमाला जाणार, मला वेळ असेल तर मी जाणार आणि काही कार्यक्रमांना आम्ही दोघेही जाणार. त्यातून राजकीय चिंता करण्याची किंवा वेगळे अर्थ काढण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण आपले महापुरुष हे आपले दैवत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांची पूजा करण्यासाठी आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो," असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीविषयी काय म्हणाले भुजबळ?
महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी अनेकदा जोर धरत असते. मात्र छगन भुजबळ यांनी या मागणीबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. "ही मागणी आपल्यातील अनेक लोक करत असतात. मी याबाबत एकदा पवारसाहेबांसोबतही चर्चा केली आहे. भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, हे बरोबर आहे, पण महात्मा गांधी, महात्मा फुले... महात्मा मोठं की भारतरत्न मोठं? भारतरत्न किती आहेत, हे सांगता येणार नाही, पण महात्मा किती आहेत? स्वत: महात्मा गांधी यांनी सांगितलं की, ज्योतीराव फुले हेच खरे महात्मा आहेत. महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर...असे दोन-तीनच महात्मा आहेत," असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.