... तर कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी ईडी कार्यालयावर मोर्चा काढू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 07:11 PM2019-09-14T19:11:13+5:302019-09-14T19:14:04+5:30
सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे.
पुणे : सध्या देशात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधकांच्या मागे सीबीआय, (अंमलबजावणी संचालनालय) ईडीमार्फत चौकशी लावली जात आहे. त्यामुळे विरोधक भयभीत झाले आहे. तसेच सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी संबंधित दोषींवर ईडी मार्फत चौकशी न झाल्यास लवकरच ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
पुण्यात विविध पुरोगामी पक्ष, संघटनांनी एकत्र येत प्रजा लोकशाही परिषद या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची घोषणा करताना ते बोलत होते. बेरोजगारी, महापुराचे संकट, कर्ज माफी, तरुणांना किती रोजगार दिले. शासकीय योजना किती यशस्वी झाल्या. यावर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र यावर एकही शब्द बोलत नाहीत. यामुळे मुख्यमंत्र्यांना अनेक ठिकाणी रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर ही महाजनादेश यात्रा नसून जनतेवर लादलेली यात्रा आहे. अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली.
बारा बलुतेदार अठरा अलुतेदार व भटके, ओबीसी अशा वंचित घटकांना हक्क, न्याय मिळावा. यासाठी परिषेदेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार आहोत. तसेच ही अराजकीय आघाडी असली तरी, यातील प्रत्येत घटकानुसार जे ते नेते विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्या पक्षांच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. परिषेदेचा मेळावा येत्या २० सप्टेंबर पुण्यात घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. निवणुकीमध्ये नक्कीच परिषद परिणाकारक ठरले, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुक स्वाभिमानी पक्ष लढविणार का या प्रश्नावर उत्तर ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी राज्यातील छोटे छोटे पक्ष एकत्रित करून महाआघाडी करूनच आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
पाकिस्तानवर भाजपचे विशेष प्रेम
कांद्याचे भाव दोन रुपये किलो असताना, कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, त्यावेळी सरकार कुठे होते. आताही शेतकऱ्यांना २३ रुपयांवर भाव मिळत नाही, तर रिटेलमध्ये कांदा ३९ रुपये किलोला विकला जातो, याची सरकारने माहिती घ्यावी. शेतकाऱ्यांना दोन पैसे मिळत असताना सरकारने कांदा आयात करू नये. कोणत्याही देशातून कांदा आयात करण्यास आमचा विरोध आहे. मात्र, या सरकारला पाकिस्तानचा कांदा, साखर गोड लागते. त्यामुळे सरकारचे पाकिस्तानवर विशेष प्रेम दिसून येते, इम्रान खान यांचे हात बळकट करत आहात का? असा सवाल शेट्टी उपस्थित केला.