राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:42 AM2022-05-02T11:42:50+5:302022-05-02T11:43:19+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला
पुणे : औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रबोधनकार ठाकरे, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे अशा विविध मुद्द्द्यांवरून त्यांनी पवारांना खडेबोल सुनावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. रमजान ईदपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेणार नाही. परंतु त्यानंतर जर मशीदवरून भोंगे काढले नाहीत. तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज यांनी सगळ्यांना काल दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनी सुद्धा राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही हनुमान चालीसा, मशीद असे मुद्दे काढून मतदारांना दुखावणार असाल तर तुमच्यासोबत कोण येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात नारायणगाव येथील एका कार्यक्रमात पत्रकारांसोबत संवाद साधला.
पुणेकर म्हणाल्या, राज्य ठाकरे तुम्ही खूप मोठे आणि अनुभवी नेते आहात. भोंगे, मशीद अशा भूमिकेमुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरू लागली आहे. त्यामुळे समाजातून तुमची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. तेव्हा असे राजकारण करून मतदारांना दुखवू नका. अन्यथा तुमच्यासोबत कोण येणार नाही. तसेच शरद पवार हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांच्यावर टीका करताना विचार करायला हवा. मागील सभेतही तुम्ही पवार साहेबांवर टीका केली होती. आता हे कुठंतरी थांबायला हवे असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज ठाकरे आता जातीपातीचे राजकारण करू लागले
महाराष्ट्रात महिला धोरण आणण्यामध्ये पवारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महिलांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. आमच्या पक्षात विविध पदांवर विविध जातीचे लोक आहेत. त्यामुळे जातीपातीचे राजकारण पवारसाहेब कधीच करणार नाही. उलट राज ठाकरे आता जातीपातीचे राजकारण करू लागले आहेत. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.