महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:58+5:302021-05-12T04:10:58+5:30
पॉझिटिव्ह स्टोरी पुणे: कोरोनाचा सामना करण्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या समर्थ भारत ...
पॉझिटिव्ह स्टोरी
पुणे: कोरोनाचा सामना करण्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या समर्थ भारत उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमधून आत्तापर्यंत ४६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, सध्या १८८ रुग्ण उपचार घेत आहे. संस्थेतील विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून या सर्व रुग्णांची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटरमध्ये ४५० बेडची सुविधा करण्यात आली आहे. ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सेंटरमध्ये काटेकोरपणे नियोजन करून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना दहा ते बारा दिवस विलगीकरणात ठेवले जात आहे. दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू तसेच दोन वेळचा पोषक आहार आदी सुविधा मोफत दिली जात आहे. औषधोपचार याबरोबरच रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी रुग्णांकडून योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करून घेतली जाते. तसेच भजन, कीर्तन, गप्पा होत आहेत.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव पी. व्ही. श्रीनिवास शास्त्री म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करत सेवाभावाचा एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. डॉक्टरांच्या मदतीसाठी तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी २५ स्वयंसेवक कार्यरत असतात. या स्वयंसेवकांकडून सर्व रुग्णांची काळजी घेतली जाते.
संस्थेकडून स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा येथे घेतली जाते. अनेकांची कोरोनाबाबतची भीती कमी झाली असून आपण समाजासाठी सेवाभाव म्हणून योगदान दिले पाहिजे, या उद्देशाने महाविद्यालयांमधील तरुण-तरुणी पुढे येत आहेत, असेही शास्त्री यांनी सांगितले.
----------------
अनेक संस्थांचे सहकार्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कोविड केअर सेंटरचा उल्लेख ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये केला. पुणे प्लॅटफॉर्म फॉर रिस्पॉन्स, सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन, विवेक व्यासपीठ यांच्याकडून या सेंटरला मोलाचे सहकार्य मिळाले.
----------
महर्षी कर्वे संस्थेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्ण संख्या
एकूण रुग्ण प्रवेश : ६९३
उपचार घेत असलेले रुग्ण : १८८
डिस्चार्ज झालेले रुग्ण : ५०५
आत्तापर्यंत बरे झालेले रुग्ण : ४६१
हॉस्पिटलमध्ये पाठवलेले रुग्ण : ४४