शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:54+5:302021-03-10T04:12:54+5:30

पुणे : गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून बंद असलेल्या न्यायालयाचे कामकाज पूर्ण वेळ सुरू झाल्याने पक्षकार, वकील, पोलिसांची न्यायालयात ...

Social Distinction in Shivajinagar District Court | शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

Next

पुणे : गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून बंद असलेल्या न्यायालयाचे कामकाज पूर्ण वेळ सुरू झाल्याने पक्षकार, वकील, पोलिसांची न्यायालयात मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. परंतु, येथे न्यायालयामध्ये प्रवेश करणा-या व्यक्तींची तपासणी केली जात नाही. परिणामी न्यायालयात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. एकीकडे पुण्यात कोरोनाने डोके पुन्हा वर काढण्यास सुरूवात केली आहे. न्यायालयाच्या परिसरातील गर्दीमुळे कोरोनाला एकप्रकारे आमंत्रणच मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा न्यायालयाचे कामकाज नऊ ते दहा महिन्यानंतर पुन्हा सुरू केले, पण ते अर्धवेळच होते. त्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर न्यायालयाचे कामकाज दोन वेळेत पूर्ववत सुरू करण्यात आले. इतके महिने न्यायालयाचे कामकाज बंद राहिल्यामुळे प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी न्यायालयात वकील, पक्षकारांची रेलचेल वाढली. आरोपींना समन्स, वॉरंट बजावण्यासाठी अथवा त्यांना कोर्टात हजर करण्यासाठी पोलिसांचीही न्यायालयात धावपळ पाहायला मिळत आहे. आरोपीला कोर्टात आणल्यावर त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या संख्येने हजर राहात आहेत. त्यामुळे न्यायालयात गर्दी होत आहे.

वकिलांकडून मास्कच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मात्र न्यायालयात प्रवेश करणा-या व्यक्तींकडून मास्क चेह-यापेक्षा हनुवटीवरच अधिक वेळ ठेवले जात आहे. पुणे बार असोसिएशनने कोर्टात गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याशिवाय गत्यंतर उरणार नसल्याचेही सांगितले जात आहे.

--------------------

गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये न्यायालयाचे कामकाज पूर्णत: बंद होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच पुन्हा न्यायालयाचे कामकाज सुरू केले आहे. पोलिसांकडून वॉरंट किंवा समन्स बजावण्यात आला, तर पक्षकारांना कोर्टात यावेच लागते. बहुतांश गर्दी ही आरोपींसमवेत येणा-या

लोकांचीच अधिक असते. त्यांना कोर्टात येऊ नका असे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर देखील पोलिसांकडून व्यक्तींना अकारण आत सोडू नये अशा सूचना दिल्या आहेत. प्रत्येक हॉलमध्ये जाऊन आम्ही वकिलांनी गर्दी करू नये असे सांगत आहोत. कोर्टाबाहेर बसलेल्या शिपायांना देखील कुणाला आत न सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

-ॲड. सतीश मुळीक, अध्यक्ष पुणे बार असोसिएशन

---------------

Web Title: Social Distinction in Shivajinagar District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.