राज्यात साजरा होणार सामाजिक समता सप्ताह
By admin | Published: April 5, 2015 12:44 AM2015-04-05T00:44:21+5:302015-04-05T00:44:21+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधूत्व या त्रिसूत्रीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याअनुषंगाने राज्यात अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागास वर्गातील घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. वंचित, दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत समता प्रस्थापित करण्याचा त्यामागे उद्देश आहे. त्यानिमित्त डॉ. आंबेडकर यांचे समतेचे मूल्य समाजात अधिक रुजावे, यासाठी सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. त्या माध्यमातून राज्यात सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या सप्ताहासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देओल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक चळवळीतील विचारवंतांचे समाजप्रबोधन व्याख्यान दि. १३ रोजी आयोजित केले जाणार आहे. पुण्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होईल. (प्रतिनिधी)
समता सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिलला सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकाच वेळी केले जाणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत कर्जाचे वाटप (दि. ९) लाभार्थ्यांना केले जाईल. दि. ११ रोजी रक्तदान शिबिर व दि. १२ तारखेला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.